मुंबई : देशातील पर्यटन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मेक माय ट्रिप कंपनीकडून परदेशी सफर करु इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर जाहीर झाली आहे. मेक माय ट्रिप कडून परदेशी सफर करु इच्छिणाऱ्या यात्रेकरुंना आता ईएमआयवर सफर बुक करता येण्याची सोय उपलब्ध होणार आहे. या यात्रेकरुंना सुरुवातीला १० ते ४० टक्के पैसे भरुन आपली सहल बुक करता येणार आहे. बाकीची राहीलेली रक्कम भरण्यासाठी प्रवासाच्या दिवसाच्या आधी किंवा पहिल्या बुकिंग नंतर ४५ दिवसांच्या आत भरता येणार आहे.
या संदर्भात मेक माय ट्रिप कंपनीने निवेदन सादर केले आहे. ही सोय प्रामुख्याने मोठ्या कौटुंबिक सहली काढणाऱ्या प्रवाशांना जास्त फायदेशीर ठरणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या अशा प्रवाशांना दोन टप्प्यांत पैसे भरुन आपले बुकिंग निश्चित करता येणार आहे. जोपर्यंत पूर्ण पैसे भरले जात नाहीत तोपर्यंत बुकिंग निश्चित होणार नाही. त्यामुळे यासुविधेचा फायदा या अशा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
या सुविधेमुळे ग्राहकांना मोठा फायदा होऊन यातून ग्राहकांप्रती असलेली आमची बांधिलकी अजून घट्ट होणार आहे. यासुविधेला मिळणारा सुरुवातीचा प्रतिसाद चांगला असून यात वाढच होत राहिल याची खात्री आहे. असे कंपनीचे मुख्य कार्यरत अधिकारी सौजन्य श्रीवास्तव यांनी सांगितले.