चंद्राच्या एका चुकीमुळे महाकुंभ होतो; काय आहे नेमकं प्रकरण?

    08-Jan-2025
Total Views |

Moon & Mahakumbh relation

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Moon & Mahakumbh relation)
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे होणारा महाकुंभ दर १२ वर्षांनी होतो. तो ग्रहांची विशिष्ट स्थिती आणि खगोलशास्त्रीय संयोगावर अवलंबून होत असतो. हा भारतातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा आहे. येथे कोट्यवधी भाविक स्नान, ध्यान आणि दान करण्यासाठी येतात. असे म्हणतात की, समुद्रमंथनादरम्यान चंद्र देवाच्या झालेल्या एका चुकीमुळे महाकुंभ प्रयागराज नगरीत होत आहे.

हे वाचलंत का? : १८३ देशांतील ३३ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी महाकुंभच्या अधिकृत वेबसाइटला दिली भेट

अशी मान्यता आहे की, कुंभमेळ्यात स्नान केल्याने माणसाचे पापं धुतली जातात. यामुळे आध्यात्मिक शांती आणि प्रगती होते. पण कुंभमेळ्याची सुरुवात एका अनोख्या पौराणिक कथेने झाली होती. ही कथा समुद्रमंथन आणि चंद्र देवाची एक छोटीशी चूक यांच्याशी संबंधित आहे. अमृत ​​कलश सुरक्षितपणे स्वर्गात नेत असताना चंद्राच्या एका चुकीमुळे अमृत कलशातील चार थेंब पृथ्वीवर पडले. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. त्यामुळे ही चार ठिकाणे पवित्र मानली गेली. तेव्हापासून, दर १२ वर्षांनी या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो, जो श्रद्धा, अध्यात्म आणि सांस्कृतिक प्रतीक आहे.

पुराणानुसार देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले होते. या मंथनातून लक्ष्मी, कामधेनू गाय, पारिजात वृक्ष आणि अमृत कलश अशा अनेक दैवी आणि मौल्यवान वस्तूंचा उदय झाला. अमृत ​​मिळविण्यासाठी देव आणि दानवांमध्ये मोठा संघर्ष झाला. राक्षसांनी अमृत कलश ताब्यात घेतला, परंतु देवांनी तो परत आणण्याची जबाबदारी इंद्रपुत्र जयंतावर दिली. जयंत जेव्हा अमृत कलश घेऊन पळाला. तेव्हा त्याच्या सोबत सूर्य, चंद्र, बृहस्पति (गुरू) आणि शनि होते. या देवतांना अमृताच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या.

सूर्य देवास अमृत कलश तुटण्यापासून वाचवण्यााची जबाबदारी. चंद्र देवास अमृत सांडणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी. गुरु बृहस्पती यांस राक्षसांना रोखण्याचे काम होते व शनि देवास जयंत अमृत पिणार नाही म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. अमृत ​​पात्र घेऊन देव स्वर्गात परतत असताना चंद्राकडून एक चूक झाली. अमृत कलषातील चार थेंब जमिनीवर पडले. हे थेंब प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैनमध्ये पडले. तेव्हापासून ही ठिकाणे पवित्र मानली जाऊ लागली आणि येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.