तब्बल ८ वेळा जनतेतून निवडून येणारे अजितदादा "ॲक्सिडेंटल नेते"!, संजय राऊतांचं विधान
07-Jan-2025
Total Views |
मुंबई : बीड सरपंच हत्या प्रकरणात सातत्याने मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, मुंडेंविरोधात कुठलाही पुरावा नसताना त्यांचा राजीनामा घेणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले असल्याची माहिती पुढे आली आहे. यावर संजय राऊतांनी अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत, अशी टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, "अजित पवारांना आणखी कोणते पुरावे हवे आहेत? ते हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत अॅक्सिडेंटल नेते आहेत. भाजपच्या आणि ईव्हीएमच्या कृपेने त्यांना जागा मिळाल्या आहेत. स्वत:च्या कर्तृत्वाने मिळालेल्या नाहीत. जर ते नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये जोपर्यंत न्यायालय निर्दोष मानत नाही तोपर्यंत आपल्या मंत्र्याला मंत्रीमंडळातून वगळले असते. बीडचे संपूर्ण पोलिस खाते बरखास्त करून तिथे नवीन नेमणूका व्हायला हव्या आणि हा संपूर्ण खटला बीडच्या बाहेर चालवायला हवा." अशी मागणी त्यांनी केली.
अजित पवार आणि संजय राऊत या दोन्ही नेत्यांचा राजकीय इतिहास पाहिल्यास अजित पवार हे तब्बल ८ वेळा बारामती विधानसभा मतदरासंघातून निवडून आलेत. थेट निवडणूकीच्या मैदानात उतरून जनतेची मते घेत त्यांनी बारामतीत आपली सत्ता कायम ठेवली.
याऊलट संजय राऊतांनी एकदाही जनतेतून निवडणूक लढवली नाही. ते सलग चार टर्म थेट राज्यसभेवर निवडून गेलेत. त्यामुळे आता त्यांनी अजित पवारांवर केलेली अॅक्सिडेंटल नेता अशी टीका कितपत योग्य आहे? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.