मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात त्यांच्या हत्येची तीन प्रमुख कारणे सांगण्यात आली आहेत.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात २६ आरोपींना अटक करण्यात आली असून ३ आरोपी अद्याप फरार आहेत. दरम्यान, आता मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात ४५९० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात बिश्नोई गँगकडून बाबा सिद्धीकींची हत्या करण्यामागे तीन कारणे पुढे आली आहेत.
बाबा सिद्दीकींची हत्या करण्यामागे सलमान खानशी जवळीक हे सर्वात प्रमुख कारण असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच कोठडीत आत्महत्या केलेल्या अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेणे आणि तिसरे कारण म्हणजे बिश्नोई गँगची दहशत निर्माण करण्यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.