मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mahakumbh Stampede) मौनी अमावस्येनिमित्त त्रिवेणी संगमात अमृत स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिसरात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. बुधवार, दि. २९ जानेवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप मिळाला नसून १४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असून त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, तसेच पर्यायी उपलब्ध घाटांचा वापर करण्याचे आवाहन भाविकांना केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजच्या संगम नाक्यावर चेंगराचेंगरी झाली. यानंतर एनएसजीसह इतर सुरक्षा दलांनी तात्काळ जबाबदारी घेतली आणि लोकांना घटनास्थळावरून हटवले. घटनास्थळी ५० हून अधिक रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या असून जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर त्रिवेणी संगम येथे भाविकांच्या येण्यावर काही काळ बंदी घालण्यात आली होती. लोकांना ते आहेत त्या घाटावर गंगेत स्नान करण्याचे आणि संगमाकडे न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या घटनेनंतर सर्व आखाड्यांनी मौनी अमावस्येचे स्नान करण्याचा निर्णय तुर्तास स्थगित केला होता. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर अमृत स्नानाचा विचार करू असे अखाड्यांचे म्हणणे आहे. दिवसभरात सुमारे ८ कोटी भाविक स्नान करतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. केंद्र सरकारनेही उत्तर प्रदेश सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रयागराज शहरात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना मेळा परिसरात वळवण्यात आल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
पवित्र स्नानासाठी ४५ घाट बांधले असतानाही लोक मुख्य संगमावरच स्नान करण्याचा आग्रह धरू लागले. त्यामुळे अचानक वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स तुटू लागले. यात काही महिलांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्या गुदमरून खाली पडल्या. प्रशासनाने महाकुंभ परिसरास 'क्राऊड डायव्हर्जन योजना' राबविल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं जातंय.