ब्रेकिंग! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
11-Jan-2025
Total Views |
मुंबई : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. एसआयटीकडून याप्रकरणाचा तपास होत असून सर्व आरोपींवर मोक्का लावण्याचा निर्णय घेतला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपुर्ण राज्यातील वातावरण तापले असून या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात येण्याची मागणी सर्वत्र करण्यात येत होती. दरम्यान, आता ही मागणी मान्य झाली असून सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनावणे या सर्व आरोपींवर मोक्का कायदा लावण्यात आला आहे. यातील एक आरोपी फरार असून त्याच्यावरसुद्धा मोक्का लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
काय असतो मोक्का कायदा?
मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा. संघटित गुन्हेगारी प्रकरणात हा कायदा लागू करण्यात येतो. खून, अपहरण, खंडणी असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का कायदा लावण्यात येतो. ‘मोक्का’ कायद्यातील २१ (३) या कलमानुसार, आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. या कायद्याअंतर्गत पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. मोक्काच्या कलम ३ (१) नुसार आरोपींना किमान ५ वर्ष जन्मठेप होऊ शकते. तसेच यात आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे.