देशाप्रती समर्पण भावना असणे आवश्यक : स्वामी स्वात्मानंद सरस्वती

    10-Jan-2025
Total Views |

Yuva Sammelan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (HSSF Yuva Sammelan)
"हिंदू जीवन पद्धतीत आपण मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव आणि अतिथीदेवो भव असे म्हणतो. परंतु स्वामी विवेकानंदांनी पाचवा मंत्र दिला 'राष्ट्रदेवो भव'. देशाप्रती समर्पण भावना असणे आवश्यक आहे. कारण 'राष्ट्रभक्ती'मुळेच आपले व्यक्तिगत, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते.", असे प्रतिपादन चिन्मय मिशनचे स्वामी स्वात्मानंद सरस्वती यांनी केले.

महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प) येथे सुरु असलेल्या 'हिंदू अध्यात्मिक सेवा मेळाव्या'त ते बोलत होते. मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्य 'युवा संमेलना'त त्यांनी 'राष्ट्रनिर्माणाचे शिल्पकार स्वामी विवेकानंद' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

स्वामी स्वात्मानंद सरस्वती यांनी उपस्थित युवांना स्वामी विवेकानंद यांचे विचार राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात किती महत्त्वाचे आहेत, याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे राष्ट्रनिर्माणाप्रती असलेले व्हिजन तसेच स्वामी विवेकानंदांच्या विचारांना धरून चिन्मय मिशनचे सुरु असलेले कार्य याबाबत संबोधित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केले. ते म्हणाले, "आजचा युवा इस्टाग्राम रिल्स बनवण्यात, सोशल मिडियावर आपले फॉलोअर्स वाढवण्यात व्यस्त आहे. एकेकाळी स्वामी विवेकानंदांना आपले आदर्श मानणारे युवापिढी आज टिकटॉक स्टार्सना, बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना आपली आदर्श मानत आहे. त्यामुळे कोल्ड प्ले सारख्या कॉन्सर्टला जाण्यापेक्षा राष्ट्रनिर्माणाच्या कार्यातील योगदानाबाबत विचार करण्याची गरज आहे." मुल्यांवर आधारितच राष्ट्रनिर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवलीच्या उत्तर विभाग उपसंचालक रेवती कुलकर्णी यांनी यावेळी 'फॉरेस्ट प्रोटेक्शन एण्ड कन्झर्व्हेशन' हा विषय यावेळी मांडला. पर्यावरणाचे संरक्षण करणे भविष्यासाठी किती महत्त्वाचे आहे यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळणारे प्राणी, पक्षी, किटक यांबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच परिसरात असलेले रेस्क्यू सेंटर, वाईल्ड लाईफ हॉस्पिटल, नेचर इन्टरप्रिटेशन सेंटर, टॅक्सिडर्मी सेंटर अशा विविध वास्तूंबाबत सांगितले. एकंदरीत त्यांनी आपल्या उद्बोधनातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची पर्यटन व्यतिरिक्त भौगोलिक आणि अभ्यासपूर्ण माहिती उपस्थितांना करून दिली.