नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडीयोवरील मन की बात चा ११४वा भाग रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी प्रसारित झाला. तमाम देशवासियांना संबोधित करत मोदी म्हणाले की "आजचा भाग मला खूप भावूक करणारा आहे, कारण आजा या मन की बातला १० वर्ष पूर्ण झाली आहे. अनेक जुन्या आठवणींनी माझ्या मनाचा ठाव घेतला आहे."
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की मागच्या १० वर्षात असंख्य देशवासियांना मी संबोधित केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी मला थेट संवाद साधता आला, त्यांच्या समस्या सोडवता आल्या. १० वर्षांपूर्वी ३ ऑक्टोबर २०१४ ला विजयादशमीच्या दिवशी मन की बातचा पहिला कार्यक्रम प्रसारित झाला आणि या वर्षी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जेव्हा कार्यक्रमाची दशकपूर्ती होत आहे, तो नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे, हा एक पवित्र योगायोग म्हाणावा लागेल.
मोदी म्हणतात, या कार्यक्रमात काही असे टप्पे होते ज्यांना मी कधीच विसरु शकत नाही. कोट्यावधी श्रोते या कार्यक्रमाद्वारे माझे सहयोगी बनले. देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी मला आवश्यक ती माहिती दिली. 'मन की बात'चे हेच श्रोते या कार्यक्रमाचे खरे शिल्पकार आहेत. मन की बात ने दाखवून दिले की लोकांमध्ये सकारात्मक गोष्टी ऐकण्याची भूक आहे. लोकांना प्रेरणादायी उदाहरणे आणि उत्साहवर्धक गोष्टी आवडतात हे यातून सिद्ध झाले आहे. या यात्रेतील प्रत्येक एपिसोड मध्ये, नवीन गोष्टी, नवे व्यक्तिमत्व, आपल्याशी जोडले गेले. यामुळे आपल्यातील सामूहिकतेचे भान जपले गेले. जेव्हा मन की बात साठी येणारी पत्रं मी वाचतो, तेव्हा मला लक्षात येतं की आपल्या देशात किती प्रतिभावान लोक आहेत. त्यांच्यामध्ये देशासाठी आणि समाजासाठी त्याग करण्याची जी शक्ती आहे, त्यामुळे मला सुद्धा अश्या लोकांकडून ऊर्जा मिळते. मोदीजी म्हणतात जनता जनार्दन माझ्यासाठी ईश्वर आहे.मन की बात हा कार्यक्रम भारताच्या २२ भाषांसहित विदेशातील १२ भाषांमध्ये सुद्धा ऐकला जातो. आज या महत्त्वपूर्ण टप्प्यावर मी आपला आशिर्वाद मागतो. असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.