Shivaji Maharaj पुतळा प्रकरण : चौकशी समिती नेमून दोषींवर कडक कारवाई करण्याची होतेय मागणी

    27-Aug-2024
Total Views |

Shivaji Maharaj Statue

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Shivaji Maharaj Statue News) 
किल्ले सिंधुदुर्ग समोरील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात आला होता. परंतु दुर्दैवाने सोमवार, दि. २६ ऑगस्ट रोजी तो पुतळा कोसळला. सदर पुतळ्याच्या उभारणीच्या कामाची सर्वंकष चौकशी करण्यासाठी तातडीने चौकशी समिती नेमावी, चौकशी अंती निष्पन्न झालेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणेच्या वतीने करण्यात आली आहे.

हे वाचलंत का? : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणेचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे म्हणाले की, "नौसेना दिनाच्या निमित्ताने ४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा भारतीय नौसेनेच्या ध्वजावर अंकित करण्यात आली. नौदलातील अधिकाऱ्यांची ब्रिटिशकालीन पदनामे बदलून ती हिंदवी स्वराज्याच्या आरमारातील अधिकाऱ्यांच्या पदनामाप्रमाणे करण्यात आली, ही सर्वच शिवभक्तांसाठी अत्यंत आनंदाची बाब होती. मात्र पुतळा पडणे ही तमाम शिवभक्तांसाठी अत्यंत दुःखाची, वेदनेची बाब आहे.", असे म्हणत त्यांनी तीव्र निषेधही व्यक्त केला आहे.

सदर पुतळ्याच्या उभारणीच्या कामाची सर्वंकष चौकशी करण्यासाठी तातडीने चौकशी समिती नेमावी, चौकशी अंती निष्पन्न झालेल्यांवर कडक कारवाई करावी आणि त्याच ठिकाणी लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याची उभारणी करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षाचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेवरून कुणीही राजकारण करू नये, असे सर्वच राजकीय पक्षांना आणि संघटनांना आवाहन करण्यात आले आहे. शिवभक्तांनी संयम बाळगून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा लवकरात लवकर उभारला जावा याचा पाठपुरावा करण्याबाबतही त्यांनी सांगितले आहे.