काहींच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे मराठा समाजाची मुले ईडब्ल्यूएस लाभापासून वंचित

भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा आरोप

    02-Aug-2024
Total Views |

darekar
 
मुंबई : राज्य पोलीस दलातील भरती प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) अर्ज दाखल केलेल्या मराठा उमेदवारांच्या भरती प्रक्रियेला नुकताच स्थगिती आदेश देण्यात आला. यावर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी काही लोकांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे मराठा समाजाची मुले ईडब्ल्यूएसच्या लाभापासून वंचित राहिली असल्याचा आरोप केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
यावेळी ते म्हणाले की, आमचे पहिल्यापासून नम्रपणे हेच सांगणे होते आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत ज्या सवलती चालू आहेत जे ईडब्लूएस आरक्षण आहे ज्यामध्ये मराठा समाज ९० ते ९५ टक्के लाभ घेत होता ते चालू राहावे, परंतु जरांगेंनी प्रश्न निर्माण केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या ईडब्लूएसचा लाभ मराठा समाजातील तरुण घेऊ शकले नाही त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मराठा तरुणांचे झालेले नुकसान कोण भरून देणार आणि याची जबाबदारी कोण घेणार? अशी विचारणा दरेकरांनी केली.
 
तसेच काही लोकांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे माझ्या मराठा समाजाच्या मुलांना ईडब्ल्यूएसच्या लाभापासून वंचित राहावे लागलेय. आता पुन्हा ईडब्ल्यूएसमधून आमच्या मुलांना का घेतले नाही म्हणून विचारणा करताहेत. त्यांचे ढोंग लोकांसमोर दिवसेंदिवस उघड होताना दिसतेय, अशा शब्दांत दरेकरांनी जरांगे यांच्यावर तोफ डागली. केवळ राजकारणासाठी राजकारण करू नका हे आमचे सांगणे आहे.
 
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलेय ते कुठल्याही प्रकारे कोर्टाने फेटाळलेले नाही किंबहुना त्या आरक्षणाची अंमलबजावणीही आता ज्या पोलीस किंवा सरकारी भरत्या झाल्या त्यात १० टक्के मराठा समाजाची मुले समाविष्ट झालीत. सगेसोयरे, नोंदणी, इतर विषय क्लिष्ट झालेत त्यातून मुलांचे ईडब्ल्यूएसचे नुकसान झालेय. सरकार स्पष्ट, पारदर्शक आहे.
 
परंतु प्रश्न धगधगतच राहावा आणि त्यातून राजकीय पोळी भाजवी असे असेल तर त्याला सरकार काय करणार, असेही दरेकर म्हणाले. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा एकत्रितपणे हिंदुत्वाची ध्वजा खांद्यावर घेऊन काम करत होती. तुम्ही हिंदुत्वाशी बेईमानी केलीत, एकत्र हिंदुत्वाच्या भूमिकेवर निवडून आलो आणि काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसलात, राष्ट्रवादी सोबत हातमीळवणी केलीत.
 
हिरव्यांचा आधार घेऊन तुम्ही मतं मिळाल्यामुळे हिंदुत्वद्वेष्टे झालात. हिंदुत्ववादी विचारांपेक्षा मतांसाठी ती भुमिका योग्य आहे त्यातून राऊतांची वक्तव्य राजकीय स्वार्थापोटी येताहेत. तसेच भाजपने हिंदुत्वाचा वापर राजकारणासाठी कधीच केला नाही. बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट मानले जायचे लोकांनी त्यांना बिरूदावली दिली होती. हिंदुत्व हा राजकारणाचा विषय नाही. संजय राऊत सकाळी उठले की त्यांना गरळ ओकायची सवय आहे.
 
त्यानुसार ते रोज एखादा इश्यू काढत असतात. संजय राऊत यांचे सर्च ऑपरेशन करावे. त्यांच्या आजूबाजूला किती टोळ्यांची लोकं वावरत असतात याचा संदर्भ तपासण्याची आवश्यकता आहे. मग अंडरवर्ल्डशी कोण संबंधित आहे हे जनतेसमोर येईल. दरेकर पुढे म्हणाले की, उबाठा गटाचे चिन्ह मशाल आहे परंतु ते कुणाच्या हातात आहे ते त्यांनी तपासून घ्यावे. हाताच्या साहाय्याने लावलेल्या मशालीने कोण तुतारी वाजवतेय याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे.
 
त्यांच्यामुळे आमच्या बुडाला आग लागणार नाही. हात आणि तुतारी सक्षम आहे, तुम्हाला राजकीयदृष्ट्या भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर बोलताना दरेकर म्हणाले की, अजित पवार अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत. त्यांच्यावर जे आरोप केले त्याचे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. बेताल, बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत.
 
जर ते करू शकला नाहीत तर अजित पवारांनी ज्या पद्धतीने आव्हान दिलेय ते स्वीकारून राजीनामे द्यावेत. राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवर दरेकर म्हणाले की, खाई त्याला खवखवे...जर ईडीची धाड पडण्यासदृश्य काही गोष्टी असतील तरच ती पडू शकते. संविधान, कायदा, नियम त्यानुसारच तपास यंत्रणा काम करत असतात.
 
विनाकारण कुणावर अशा प्रकारची धाड पडत नसते. काही तथ्य नसेल तर धाड पडायचे कारण नाही. अशा प्रकारचे बेताल, बिनबुडाचे वक्तव्य करून राहुल गांधी स्वतःच स्वतःभोवती गुरफटत आहेत. त्या गुरफट्यातून त्यांच्या मनात भीती निर्माण झालीय.
लाडकी बहीण योजनेच्या प्रतिसादामुळे संजय राऊत आणि मविआ भयभीत झालेत
दरेकर म्हणाले की, लाडकी बहीण ही योजना अत्यंत लोकप्रिय झालीय. कोट्यावधी महिला, भगिनी प्रतिसाद देताहेत. महायुतीसाठी चांगले वातावरण निर्माण झालेय. त्यामुळे संजय राऊत आणि महाविकास आघाडी भयभीत झालीय. पैसे कुठून आणणार, बंद करणार अशा वलग्ना करताहेत.
 
तुम्ही सरकारमध्ये परत नको, तुम्ही ती योजना बंद कराल. आम्ही चालू केलेली योजना सुरू राहावी यासाठी सरकारही आमचे या महिला निश्चितपणे आणतील. संजय राऊत यांनी चिंता करू नये. अर्थसंकल्पात तरतूद केलीय. येणाऱ्या काळात महायुतीचे सरकार येईल लाडक्या बहिणींचा विषय अशाच पद्धतीने ताकदीने पुढे नेतील, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.