गणरायासाठी मूर्तिकारांची लगबग

रंगरंगोटीच्या कामाला वेगयंदा किमतीत होणार वाढ

    09-Jul-2024
Total Views |

Ganesh
 
नाशिक : दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची बाप्पाच्या विविध आकाराच्या रेखीव आणि सुबक मूर्ती तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वच मूर्तिकारांकडून रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा गणपतीच्या राममंदिर, द्वारकाधीश, लालबाग आणि दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. त्याचप्रमाणे, घरात विराजमान होणार्‍या बाप्पाच्या कृष्णरुप आणि बालगणेश या मूर्तीदेखील बनविल्या जात आहेत.
 
नाशिक जिल्ह्यातील मूर्तींना धुळे, जळगावबरोबरच गुजरातमधील सुरत, नवसारी आणि बडोदा येथे मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या किमान एक ते दीड महिना अगोदर मूर्ती राखीव केली जाते. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरपासून मूर्ती खरेदी आणि विक्रीसाठी लगबग सुरू होईल. मुंबईतील गणेशोत्सवात 20 ते 22 फुटांपर्यंत मूर्ती विराजमान होतात.
 
या मूर्तीचे लहान स्वरुप तयार करण्यात येत असून त्यांची उंची दहा ते 12 फुटांपर्यंत आहे. यंदा महागाईत वाढ झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत 100 रुपयांनी मूर्तींची किंमत वाढली आहे. साधारणपणे 250 ते 12 हजारांपर्यंत मूर्तींची किंमत आहे. एकूणच यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
 
पीओपी बंदीचा फटका
 केंद्र शासनाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली असून मूर्ती तयार करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. पीओपीचा वापर करून तयार होणार्‍या मूर्तींवर आणि साठा करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. या अनुषंगाने नाशिक मनपाकडून पीओपी वापरावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
 
मात्र, नाशिक शहर आणि जिल्हा मिळून तीन लाखांच्या आसपास गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. तसेच, बाहेरील राज्यातूनही शहरात मूर्तिकार दाखल झाले आहेत. पीओपी वापरावर बंदी घातल्याचा विपरित परिणाम या व्यवसायावर झाला असून हा व्यवसाय धोक्यात आल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे.
 
मी लहानपणापासून मूर्ती बनविण्याचे काम करतो. आता या व्यवसायात खूप स्पर्धा वाढली आहे. त्यात परराज्यातील मूर्तिकार मिळेल त्या किमतीत मूर्ती विकून मोकळे होतात. यातून मार्ग काढून हळूहळू मूर्तींना मागणी वाढायला सुरुवात झाली होती. पण पीओपीच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याने आता तयार झालेल्या मूर्तींचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, हळूहळू शाडूची मूर्ती घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालला आहे. - गणेश वैद्य, मूर्तिकार, नाशिक