बीच व्हॉलीबॉलपटू मैदानात येताच क्रीडाप्रेमींना आठवली २०१४ सालची घटना!
28-Jul-2024
Total Views | 43
नवी दिल्ली : नेदरलँडचा बीच व्हॉलीबॉल खेळाडू स्टीव्हन व्हॅन डी वेल्डे हा ऑलिम्पिकच्या मैदानात उतरला आहे. सन २०१४ साली इंग्लंड येथे १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यामुळे त्याला ४ वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली होती. या घटनेवेळेस वेल्डे याचे वय १९ वर्षे इतकेच होते. आता पॅरिसमधील ऑलिम्पिक २०२४ मध्ये जेव्हा स्टीव्हन नेदरलँड्सकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा प्रेक्षकांनी त्याला खूप दाद दिली, त्यानंतर ही बाब संपूर्ण जगाच्या ध्यानात आली आहे.
दरम्यान, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एकीकडे, महिला रायडर शार्लोट दुजार्डिनला ऑलिम्पिकमधून बाहेर फेकण्यात आले. कारण ४ वर्षांपूर्वी तिने तिच्या घोड्याला २४ वेळा चाबूक मारला होता. हे कृत्य अमानवीय आणि प्राण्यांविरुद्ध असल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, त्यांना घोड्यांच्या दानासाठी म्हणून नेमलेल्या राजदूत पदावरूनही काढून टाकण्यात आले. त्याचबरोबर स्टीव्हनसारख्या बलात्काऱ्याला ऑलिम्पिकमध्ये स्थान दिले जात आहे. यावरून ऑलिम्पिकच्या आयोजकांची दुटप्पी वृत्तीही दिसून येत आहे.
बीबीसी पॅनेलच्या सदस्यांनी दिल्या होत्या शुभेच्छा
बीबीसी क्रीडा तज्ञ आणि माजी ऑलिंपियन पॉला रॅडक्लिफ यांनी स्टीव्हन व्हॅन डी वेल्डे याला शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. रॅडक्लिफ यांनी तो आता विवाहित पुरुष असून तो पूर्णपणे बदलला आहे असे सांगून त्याचा बचाव केल्याचे समोर आले. "मी त्याला शुभेच्छा देते कारण त्याने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे आणि आता त्याने लग्न केले आहे," असे त्या म्हणाल्या. मात्र, लोकांनी रॅडक्लिफ यांच्यावर जोरदार टीका केल्यावर त्यांनी माफी मागितली.