बांगलादेशात कट्टरपंथीयांचा हिंदूंवर हल्ला; ६० जण जखमी

    11-Jul-2024
Total Views |
 Hindu persecution
 
ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका येथे हिंदूंवर हल्ल्याची घटना घडली असून त्यात ६० जण जखमी झाले आहेत. हा हल्ला ढाक्यातील मिरांजिला कॉलनीत झाला. जिथे हिंदूंची घरे पाडण्यात आली आणि मंदिरालाही लक्ष्य करण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दि. १० जुलै २०२४ दुपारी १.३० च्या सुमारास दंडाधिकारी मुहम्मद मोनीरुझमान यांनी ढाका येथे हिंदू अल्पसंख्याकांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात आलेल्या मिरंजिला कॉलनीला भेट दिली. या कारवाईला स्थानिक नगरसेवक मुहम्मद औवाल हुसैन आणि त्याच्या समर्थकांनी विरोध केला आणि हिंदूंवर हल्ला केला. तेथे जोरदार दगडफेक झाली आणि इस्लामिक कट्टरवाद्यांनी घरांवर हल्ले करून त्यांची नासधूस केली. यावेळी मंदिरालाही लक्ष्य करण्यात आले.
  
इस्लामिक कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात किमान ६० हिंदू जखमी झाले, त्यांना ढाका मेडिकल कॉलेज आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशन मिरांजीला कॉलनी परिसराची देखरेख करते. महिनाभरापूर्वी स्थानिकांना हुसकावून लावण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अनेक घरे पाडण्यात आली, मात्र देशभरातील आंदोलने आणि निदर्शने पाहता प्रशासनाने घरे रिकामी करण्याची मोहीम थांबवली होती.
  
या वेळी ज्यांची घरे पाडण्यात आली त्यांना मिरंजीला कॉलनीतून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने मदत करण्याचा निर्णय घेतला. यातील बहुतांश लोक हिंदू होते. या ठिकाणी हिंदूंचे पुनर्वसन का केले जात आहे, याचा राग विरोधी पक्ष अवामी लीग आणि इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या नेत्यांना झाला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होणे सामान्य झाले आहे.
 
या वर्षाच्या सुरुवातीला ७ जानेवारी रोजी बांगलादेशच्या निवडणुकांनंतर अनेक हिंदूंना आपली घरे सोडावी लागली होती. त्यांची घरे जाळण्यात आली आणि घरे लुटली गेली. बांगलादेशात फरीदपूर, सिराजगंज, बागेरहाट, झेनाइदह, पिरोजपूर, कुश्तिया, मदारीपूर, लालमोनिरहाट, दौदकंडी, ठाकूरगाव, मुन्शीगंज आणि गायबांधासह अनेक ठिकाणी असे हल्ले झाले.