संस्कृतसेवक : प्रणव

    01-Jul-2024
Total Views | 63
pranav gogate


संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी ‘परोपकारार्थं इदं शरीरम्’ हे तत्व डोळ्यांसमोर ठेवून आपले जीवन वाहून नेणार्‍या प्रणव गोगटे यांच्याविषयी...

प्रणव गोगटे मूळचे सिंधुदुर्गमधील कुडाळचे. परंतु, कुटुंब गोव्यात स्थायिक असल्यामुळे बालपण आणि शालेय शिक्षण गोव्यातच पूर्ण झाले. वडील आणि काका इंजिनियर असल्यामुळे प्रणवनीसुद्धा दहावीनंतर इंजिनियरिंग डिप्लोमाला प्रवेश घेतला.

ते करतानाच त्यांनी संस्कृत भारतीच्या दहा दिवसीय संभाषण शिबिरात भाग घेतला. आणि आत्तापर्यंत संस्कृतचा गंधही नसलेल्या प्रणव यांचा ‘मम नाम प्रणवः’ असे म्हणत संस्कृतचा ‘श्रीगणेशा’ झाला. त्याच दहा दिवसांत संस्कृतबद्दल आपुलकी, आवड निर्माण झाली. तेथे शिकवणार्‍यांची, मदत करणार्‍यांची संस्कृतच्या प्रचार व प्रसारासाठी निरपेक्ष भावनेने काम करण्याची तळमळ, ते वातावरण, तो उत्साह प्रणवना खूप भावला. कालांतराने नाश होत चाललेली आपली जननीभाषा जपण्यासाठी संस्कृत भारतीकडून घेतली जाणारी मेहनत आणि समर्पणभावना पाहून प्रणवना आपणही असेच काहीतरी करावे, अशी प्रेरणा मिळाली.
तेव्हापासून जवळपास कोठेही संभाषण शिबीर असले की प्रणव तेथे जाऊन बसत असत. ते जास्तीतजास्त संस्कृत ऐकत होते. शिबिराची, संस्थेची व्यवस्था समजून घेत होते. छोटी-मोठी मदतही करत होते. पुढे त्यांनी रीतसर प्रशिक्षण घेतले आणि या संभाषण शिबिरात ते स्वतः शिकवू लागले. त्यातून गोडी आणि आनंद वाढतच गेला.
 
ही आवड केवळ छंद म्हणून न जोपासता त्यांनी इंजिनियरिंग डिप्लोमानंतर थेट बीए संस्कृतला प्रवेश घेतला. त्याचवेळी संगीताची आवड असल्यामुळे तबल्यामध्ये करत प्रणवनी बीए म्युझिकदेखील केले. इंजिनियरिंग डिप्लोमाच्या वसतिगृहातील वातावरणामुळे व्यक्तिमत्व विकास झाला आणि दोन बीए एकत्र केल्यामुळे आयुष्याला लयबद्धता मिळाली, असे प्रणव सांगतात. पुढे त्यांनी संस्कृतमध्येच बीएड आणि एमएदेखील केले. ""Don't change your profession into your hobby. Change your hobby into your profession. And your life will be wonderful,'' असे प्रणव म्हणतात. या सर्व प्रवासामध्ये त्यांना आईबाबा आणि धाकटी बहीण प्रचिती यांची कायम साथ लाभली. आणि अर्थातच ‘जे ठरवीन ते करू शकतो’ या विश्वासामुळे ते आज संस्कृतक्षेत्रात स्थिरावू शकले आहेत.

प्रणव शाळेत असताना रा. स्व. संघाच्या बालशाखांमध्ये जात असत. पण पुढे संस्कृत भारतीचा प्रशिक्षणवर्ग आणि रा. स्व. संघाचे शिबीर एकाचवेळी आले आणि त्यांनी संस्कृत भारतीचा मार्ग निवडला. परंतु, संस्कृत भारती आणि रा. स्व. संघ या दोन्हींचे विषय जरी वेगळे असले, तरी संस्कृत भारती ही रा. स्व. संघाचीच एक शाखा असल्यामुळे ते एकमेकांना पूरक ठरतात. शिवाय, संस्कृत भारती ही संपूर्ण देशव्यापी संस्था असल्यामुळे भारताच्या कोणत्याही कोपर्‍यात गेलो, तरी आपण आपल्याच परिवारात असल्यासारखे वाटते, असेही प्रणव म्हणतात. संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्यांमधील सर्वचजण पूर्णपणे संस्कृतसाठी कार्य करणारे नसतात, तर वेगवेगळ्या क्षेत्रांमधील लोक केवळ आवड म्हणून संस्कृत शिकतात. समाजातील वेगवेगळ्या पेशांचे, स्तरांचे, वयाचे लोक प्रणवकडून शिकून आज निरंतर संस्कृत प्रचारासाठी कार्य करीत आहेत. असे शेकडो कार्यकर्ते संघटनेच्या मदतीने प्रणवनी घडवले आहेत. ते आज गीता, वेद इत्यादी शिकत आहेत.

संस्कृत ही केवळ एक भाषा नसून ती संस्कृती आहे. त्यात संस्कार आहेत. ‘न च क्लिष्टा, न च कठिना’ अशा संस्कृतप्रती असणारी भीती व न्यूनगंड हेच आज संस्कृत मागे पडण्याचे कारण आहे. परंतु, प्रयत्न केल्यावर ती सोपी आहे, असे कळते. त्याचबरोबर, संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती सांगता येते. शास्त्राचे ज्ञान असणारा तो शास्त्रज्ञ, अशाप्रकारे प्रत्येक शब्दाचा खोलात जाऊन विचार केला, तर संस्कृत शिकण्याची खरी मजा अनुभवता येते. शिवाय, संस्कृतमुळे वाणी शुद्ध होते आणि स्मरणशक्तीदेखील वाढते. ‘भारत - संस्कृत = इंडिया’ अशी सुंदर व्याख्या प्रणव सांगतात. ‘भायां रतः इति भारतः’ अर्थात, जो तेजावर आरूढ झाला आहे तो भारत. आणि हे वैभव मिळवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे संस्कृत!

प्रणवच्या याच भाषेवरील वैयक्तिक प्रेमामुळे त्यांचा संस्कृतच्या प्रचार-प्रसारातील समर्पणभाव आजपर्यंत कायम आहे. विद्यार्थी संस्कृत बोलताना त्याच्या चेहर्‍यावरील आनंदच प्रणवना खूप काही देऊन जातो. विद्यार्थ्यांच्या भाषेत हळूहळू घडणारी सुधारणा त्यांना पुढे अजून जोमाने काम करण्याची ऊर्जा प्रदान करते. प्रणव आज खखढ इेालरूमधील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली संचालित उशपीींश षेी डरपीज्ञीळीं ङशरीपळपस हे केंद्र चालवतात. याव्यतिरिक्तदेखील संस्कृतचा प्रचार करत असल्यामुळे ते जणू एक पूर्ण वेळ कार्यकर्ताच आहेत. ते स्वतःला ‘संस्कृतसेवकः’ असे म्हणवतात. आणि आता ‘संस्कृतसेविका’ सुमेधा त्यांना पत्नी म्हणून लाभल्यामुळे अजून जोमाने संस्कृतचा प्रचार करण्याची त्यांची इच्छा आहे.

‘देवभाषा संस्कृतम्’ ही ‘बोलीभाषा संस्कृतम्’ होण्यासाठी यथाशक्ती, यथामती प्रयत्न करत संस्कृतचा जास्तीतजास्त प्रचार-प्रसार करणे, हेच त्यांचे ध्येय आहे. ‘उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि, न मनोरथैः’ असे म्हणत चिरंतन संस्कृतकार्य करणार्‍या प्रणव गोगटे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून संस्कृतमय शुभेच्छा!
 
ओवी लेले
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121