विधानसभेला 150 जागा लढवणार नाना पटोले

‘उबाठा’, पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न

    07-Jun-2024
Total Views |
 
Nana patole
 
मुंबई :  लोकसभा निवडणुकीत 13 जागा मिळवल्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणून स्वप्ने पडू लागलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत तब्बल 150 जागा लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या उबाठा आणि शरद पवार गटातील नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पटोले यांनी विधानसभेसंदर्भात वक्तव्य केले. ते म्हणाले, आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष 150 जागा लढविण्याच्या तयारीत आहे.
 
लोकसभेत महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी साडेतीन महिने लागले. विधानसभेत हे कटाक्षाने टाळावे लागेल. त्यासाठी महिन्याभरात जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करावा लागेल. त्यामुळे आतापासूनच तयारी करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. सांगलीत उबाठा गटाचा पराभव झाल्यामुळे त्यांच्याकडून काँग्रेसच्या नेत्यांचा दुस्वास सुरू असताना, नाना पटोले यांनी उबाठाला पुन्हा डिवचले आहे.
 
ते म्हणाले, सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटीलसुद्धा आमच्यासोबत येतील. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळाले. आम्ही हाच उत्साह घेऊन विधानसभेच्या मैदानात उतरू, असे सांगत पटोले यांनी ठाकरे आणि पवारांच्या खांद्यांची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.