एनडीएचे संख्याबळ वाढलं; 'या' राष्ट्रीय पक्षाने दिला पाठिंबा

    07-Jun-2024
Total Views |
 NPP
 
ईटानगर : अरुणाचल प्रदेशातील प्रेमा खांडू यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या नेतृत्वाखालील एनपीपीने विधानसभा निवडणुकीत २० जागांवर उमेदवार उभे केले होते. ६० जागा असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेत एनपीपीचे पाच आमदार आहेत.
 
"नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने जनतेचा जनादेश स्वीकारला असून प्रेमा खांडू यांच्या सरकारला आम्ही पाठिंबा देऊ", असे एनपीपीचे प्रदेशाध्यक्ष थंगबंग वांगम यांनी सांगितले. लाँगडिंग-पुमाओ विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले वांगम म्हणाले की, "पक्षाकडे राज्य, प्रदेश आणि देशासाठी स्पष्ट दृष्टी आहे. आमच्याकडे राष्ट्रीय दृष्टी असलेल्या प्रादेशिक आकांक्षा आहेत आणि आम्ही राज्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी नेहमीच काम करू."
 
लोकसभा निवडणुकीबरोबरच अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या होत्या. ६० जागांच्या विधानसभेत भाजपचे ४६ आमदार निवडून आले. यातील १० आमदार हे बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये अरुणाचलप्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांचाही समावेश होता. विधानसभेबरोबरच अरुणाचल प्रदेशच्या दोन लोकसभा जागांवरही भाजपचे खासदार निवडून आले होते.
 
एकीकडे एनडीएला 'एनपीपी'सारखा राष्ट्रीय पक्ष पाठिंबा देत असताना, दिल्लीत इंडी आघाडीत मोठी फूट पडली आहे.
दिल्ली सरकारमध्ये मंत्री आणि आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते गोपाल राय यांनी आप दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणूका स्वातंत्र्य लढणार असल्याची घोषणा केली आहे.