नरेंद्र मोदींचा पलटवार!

    07-Jun-2024
Total Views |
 Narendra Modi
 
एनडीए आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वीच्याच उत्साहात आणि आत्मविश्वासपूर्ण शब्दांत निवडणूक निकालाबाबतच्या सार्‍या निराशाजनक भावना उडवून लावत, हा विजय किती भव्य आणि ऐतिहासिक आहे, त्याचे महत्त्व अधोरेखित केले. सर्व घटक पक्षांचा आदर करतानाच या आघाडीत कोणाचा शब्द अंतिम असेल, तेही त्यांनी सूचकपणे स्पष्ट केले. सर्व घटकपक्षांच्या ऐक्याच्या दर्शनाने केंद्रात जोड-तोड करून सरकार बनविण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांमधील हवाच निघून गेली आहे.

कमालीच्या उकाड्याने त्रस्त झालेल्या भारतीयांना मृगाच्या पर्जन्यसरींनी जितका दिलासा आणि आनंद मिळेल, तसा आनंद आणि सुखद अनुभव शुक्रवारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने दिला. मंगळवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरातील जनतेच्या मनावर आणि अगदी भाजपच्या काही नेत्यांच्या मनावर पसरलेले निराशेचे सावट शुक्रवारच्या एनडीएच्या, म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीने पार धुवून टाकले. जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत मोदी यांचीच या आघाडीच्या नेतेपदी निवड झाली. या कार्यक्रमातील एनडीएच्या नेत्यांची भाषणे आणि देहबोलीने या आघाडीचा हा विजय किती भव्य आणि ऐतिहासिक आहे, ते ठसठशीतपणे भारतातील जनतेला जाणवून दिले. या बैठकीस आलेल्या एनडीएच्या सर्व नेत्यांची भाषणे ही मोदी यांच्याबद्दल वाटणार्‍या आदराने ओतप्रोत भरली होती. आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या नेत्याला मोदींबरोबर व्यासपीठावर स्थान दिले होते. त्यात अगदी एकच खासदार असलेले अजित पवार आणि बिहारचे जितनराम मांझी यांचाही समावेश होता. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या भाषणात आपण एनडीएबरोबरच सदैव राहू, याचा पुनरुच्चार करीत आपल्या पलटूरामच्या प्रतिमेला छेद दिला.
 
आपल्या भाषणात गमतीशीर शब्दांत त्यांनी पुढील निवडणुकीत राहिलेली विजयाची कसर भरून काढण्याचे आश्वासन दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोदी यांचे स्वागत करताना त्यांनी चक्क मोदींना चरणस्पर्श केला. त्यांच्या या कृतीने त्यांनी या आघाडीत खरा बॉस कोण आहे, ते दाखवून देतानाच मोदी यांना आपली भक्कम साथ लाभेल, हेही सूचित केले. तसेच मोदी हे येत्या पाच वर्षांत राहिलेला अजेंडा पूर्ण करतील, असेही नमूद केले. चिराग पासवान या तरूण आणि आश्वासक नेत्याला भाषण करून परतताना मोदी यांनी जवळ घेऊन त्यांचा चेहरा कुरवाळला. त्यावरून पासवान यांच्याबद्दल मोदी यांना वाटत असलेले ममत्त्व व विश्वास याचे दर्शन घडले. चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या भाषणात मोदी यांच्या न थकता सतत काम करण्याच्या शैलीचे कौतुक केले आणि त्यांच्या साथीने नव्या सुधारणा करण्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले. एकंदरीत सर्व घटक पक्षांच्या नेत्यांच्या भाषणांनी ही आघाडी एकसंध असून तिचे कार्य सर्वसंमतीने चालेल, असे चित्र उभे केले.

लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशीही मोदी यांचे भाजप मुख्यालयात भाषण झाले. तसेच शुक्रवारच्या एनडीएच्या बैठकीत मोदी पुन्हा एकदा आपल्या आत्मविश्वासू रूपात दिसून आले. तासाभरापेक्षा अधिक काळ चाललेल्या त्यांच्या भाषणात भाजपला बहुमत न मिळाल्याबद्दल कसलाही खेद वा निराशा जाणवत नव्हती. उलट पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने आणि उमेदीने भारताला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी बाह्या सरसावून कार्य करण्यास मोदी उत्सुक बनल्याचे दिसून आले. भारताच्या भवितव्यासंबंधी त्यांनी आशादायक आणि विश्वासू चित्र उभे केले. भारताच्या लोकशाही प्रक्रियेचे सामर्थ्य त्यांनी विशद केले. एनडीएचे घटक पक्ष हे देशाच्या सर्व भागांत विखुरलेले आहेत, असे सांगत आपल्या आघाडीला देशव्यापी पाठिंबा असल्याचे मोदी यांनी दाखवून दिले. तसेच सरकार चालविण्यासाठी बहुमत आवश्यक असले, तरी देश चालविण्यासाठी घटक पक्षांमध्ये एकमत असणे गरजेचे असते, असे ते म्हणाले. आपल्या भाषणात मोदी यांनी विरोधकांना जे शालजोडीतील आहेर दिले, त्यातून या ‘इंडी’ आघाडीची दुटप्पी, ढोंगी, असहिष्णू आणि खुनशी प्रवृत्ती उघड झाली. निवडणूक निकाल पाहताना आता ईव्हीएमवर संशय घेणे कायमचे बंद होईल, असे सांगत मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांची खिल्ली उडविली आणि त्यांचा दुटप्पीपणा उघड केला. भारतीय निवडणूक आयोगाच्या नि:पक्षपाती कारभारावरही या निवडणुकांनी शिक्कामोर्तब केल्याचे सांगून, मोदी यांनी इतक्या भव्य प्रमाणावर असूनही सुरळीतपणे या निवडणुका पार पाडल्याबद्दल आयोगाचे आभार मानले.
 
यंदा भाजपला फक्त स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाले नाही. पण, ही गोष्ट म्हणजे जणू भाजपची हार आहे, जनतेने भाजपला नाकारले आहे, असे भासविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. काँग्रेसच्या या दाव्याचा फोलपणा उघड करताना मोदी यांनी काँग्रेसने गेल्या तीन लोकसभा मिळून केवळ १९५ जागांवर विजय मिळविल्याचे दाखवून दिले. उलट केवळ यंदाच्या निवडणुकीतच भाजपने तब्बल २४० जागांवर विजय मिळविला असून, काँग्रेसला तीन आकडी संख्याही गाठता आली नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. भाजपच्या एकट्याच्या जागा या संपूर्ण ‘इंडी’ आघाडीच्या सर्व पक्षांपेक्षा अधिक आहेत. जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविण्याचे काँग्रेसचे धोरण उघड करताना त्यांनी नुकत्याच लखनौमध्ये काँग्रेसच्या मुख्यालयावर लागलेल्या लोकांच्या रांगा दाखविल्या. आपण महिलांना दरमहा ८,५०० रुपये देऊ असे आश्वास राहुल गांधी यांनी आपल्या ‘खटाखट’ भाषणात दिले होते. त्यासाठी लोकांकडून अर्जही भरून घेतले होते. आता हे पैसे घेण्यासाठी महिलांनी काँग्रेसच्या मुख्यालयावर रांगा लावल्या, तरी पैसे मिळतच नसल्याचे त्यांना दिसून आले.
 
भारताची आणि भारतातील लोकशाहीची बदनामी परदेशात करणे ही काँग्रेसची जुनीच सवय आहे, असे सांगून त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. निवडणुका सुरू असताना त्यात अडथळा आणण्यासाठी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. पण, न्यायालयाने त्या फेटाळून लावल्या. यावरून काँग्रेसचे लोकशाहीवरील प्रेम किती बेगडी आहे, ते स्पष्ट होते, असे ते म्हणाले. आपल्या भाषणात मोदी यांनी येत्या पाचच नव्हे, तर पुढील दहा वर्षांत आपण बर्‍याच सुधारणा राबवून भारताच्या अर्थव्यवस्थेला तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवू, असे आश्वासन दिले. त्यांच्या या भाषणावरून आपल्या सरकारच्या स्थैर्याबद्दल तसेच आपल्या अजेंड्याबाबत मोदी यांच्या मनात कसलीही शंका नसल्याचे दिसून आले. हाच विरोधकांना त्यांनी दिलेला सर्वात मोठा संदेश होता. एनडीएतील घटक पक्षांना फोडून येनकेन प्रकारेण केंद्रात सरकार बनविण्याच्या काँग्रेसच्या आणि तिच्या सहयोगी पक्षांच्या प्रयत्नांवर मोदींच्या पलटवाराने पाणी पडले आहे.