वरळीत आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा

‘उबाठा’ला दुबळे मताधिक्य; विधानसभेला दगाफटका होण्याची भीती

    07-Jun-2024
Total Views |
Aditya Thakre
 
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वांत प्रतिष्ठेच्या म्हणून ओळखल्या गेलेल्या दक्षिण मुंबईच्या लढतीत उबाठा गटाने बाजी मारली असली. असे असले तरी, त्यांचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. उद्धवपुत्रासाठी दोन नेत्यांचा बळी घेऊन सुभेदारी (विधान परिषदेची आमदारकी) बहाल केल्यानंतरही त्यांना वरळीत मताधिक्य टिकवता आलेले नाही. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा कस लागणार आहे.
 युवराज मतदारसंघ बदलणार?
 
आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत भाजपने बॅनरबाजी केली आहे. वरळीकरांचे लाख लाख आभार असे बॅनर लावून वरळीमध्ये घटलेल्या मतांवरुन भाजपने ठाकरेंना डिवचले आहे. ज्या ठिकाणी अरविंद सावंत लोकसभेमध्ये उतरले होते ते जरी जिंकून आले असले तरी वरळी मतदारसंघामध्ये त्यांची मतमोजणीच्या वेळी पिछेहाट झाली होती. वरळीकरांनी दिलेला जनादेश स्वीकारुन येणार्‍या विधानसभेत वरळीकरांचा जास्तीत जास्त आशीर्वाद घेऊन लोकसभेची कसर भरून काढू, असा संदेश देण्यात आला. वरळी कोळीवाडा हेमांगी वरळीकरांच्या 193 वॉर्डमध्ये 598 मतांनी मागे आणि किशोरी पेडणेकर यांच्या 199 वॉर्डमध्ये 541 मतांनी अरविंद सावंत मागे पडले.
 
 उद्धव ठाकरे गटाला 64 हजार 844 मते मिळाली. भाजप-शिवसेनेला म्हणजे यामिनी जाधवांना तब्बल 58 हजार 129 मते मिळाली. या पिछेहाटीमुळे आता उबाठाचे युवराज आदित्य ठाकरे आपला मतदारसंघ बदलून शिवडी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांना विधिमंडळ राजकारणात आणण्यासाठी 2019 मध्ये सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचा बळी देत, त्यांना मागच्या दाराने विधान परिषदेवर घेण्यात आले. त्यामुळे वरळीत एकूण तीन आमदारांचे बळ तयार झाले.
 
लोकसभा निवडणुकीत त्या बळाची प्रचीती येणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात तसे घडले नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाच्या अरविंद सावंत यांना बालेकिल्ल्यातच आव्हानांना तोंड द्यावे लागले. वरळी विधानसभा मतदारसंघात सावंत यांना केवळ 64 हजार 844 मते मिळाली. तर, शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी तब्बल 58 हजार 129 मते खेचली. दोघांमधील मतांचे अंतर हे केवळ 6 हजारांच्या आसपास असल्यामुळे उबाठा गटाने त्याचा मोठा धसका घेतला आहे. भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघाच्या जोरावर तूर्त अरविंद सावंत विजयी झाले असले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत वरळीत दगाफटका होण्याची भीती आहे. परिणामी, आदित्यसाठी ’सेफ’ केलेला मतदारसंघ एकाएकी ’अनसेफ’ झाल्याने ठाकरेंच्या गोटात चलबिचल वाढली आहे.