राज्यातील जलस्रोतांचे होणार बळकटीकरण!

पाणीपुरवठा मंत्र्यांनी घेतला जलस्थितीचा आढावा

    11-Jun-2024
Total Views |
water sorces maharashtra state
 


मुंबई :    राज्यातील धरणे आणि तलावांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागांत आजपर्यंत पर्जन्यमान अपुरे झालेले आहे. भविष्यकाळात ही समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असल्यामुळे राज्यातील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्याच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवार, दि. ११ जून रोजी दिल्या.

राज्यातील पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत मंत्री पाटील यांनी मंत्रालयात आढावा घेतला. या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे अभियान संचालक आर. रवींद्र तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत व जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनांचाही आढावा घेतला.

जल जीवन मिशनच्या विहिरी, बांधकामे यासारखी कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी. ज्या गावातील योजनेचे किरकोळ काम शिल्लक आहे, अशी कामे तात्काळ पूर्ण करावीत. भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांनी मान्सूनपूर्व आणि मान्सून पश्चात भूजल पातळी याबाबतचा आराखडा तयार करावा. जलस्रोत बळकटीकरण, भूजल पुनर्भरण होणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी केल्या.


कोणतेही प्रस्ताव प्रलंबित ठेवू नका!

पाणी टंचाईच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने जलदगतीने कार्यवाही करावी. याबाबतचे कोणतेही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रीत करून स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी यांनी टँकरबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.