नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मित्र प्रविण तरडेंची खास पोस्ट

    10-Jun-2024
Total Views |
 
pravin tarade post
 
 
मुंबई : लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जूनला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांची वर्णी लागली. यापैकीच एक म्हणजे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी यश मिळवत मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच झटक्यात खासदारीकी मिळवली. त्यांच्या या यशावर दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
 
प्रवीण तरडे यांनी लिहिले आहे की, “मित्रा, आज शब्दं अपुरे पडतील पण लेखन थांबायचं नाही. कित्येक जण योगायोगानं राजकारणात येतात पण तू काहीतरी ठरवून यामधे आलास. राजकारणात येवून लोक समाजकारण लोणच्यासारखं वापरतात पण तू ते ताट भरून घेतलंस, पोटभरून रिचवलंस...कदाचित म्हणूनच कोरोनाच्या महामारीत तू पुण्याला वाचवलंस . तुझ्या त्या पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली अन् पुणेकरांनी पण त्याची सव्याज परतफेड केली...तुला लाखोच्या मताधिक्यानं दिल्ली दाखवली. दिल्लीनं तर दिलादारपणाचा कळस गाठला आणि थेट मंत्रीपदाची माळ तुझ्या गळ्यात घातली...पण मित्रा एवढं सगळं होउनही असं वाटतंय ही तर फक्त सुरवात आहे अजुनही “परम वैभवम नेतुमेतत स्वराष्ट्रम" या दैवी संदेशापासून आपण थोडं दूरच आहोत. येत्या पंचवीस वर्षात जितकं जमेल तितकं या दैवी संदेशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू... पुण्येश्वराची पुण्याई तुझ्या पाठीशी आहेच बाकी मुळशीची शान , पुण्याचा अभिमान , भारत देशाचा स्वाभिमान ठरो... तुझं खूप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा”.
 
pravin tarade post