ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला राऊतांचा विरोध! मातोश्रीच्या आतल्या बातम्या बाहेर आणण्याची धमकी

    19-May-2024
Total Views |
 
Thackeray & Raut
 
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचा सर्वात जास्त विरोध होता. यासाठी त्यांनी मातोश्रीवरील आतल्या बातम्या बाहेर आणण्याची धमकी दिली होती, असा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाला त्यांच्याच सरकारमधील लोकांनी विरोध केला होता, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. यावर आता राणेंनी प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊतांनी आपल्या दोन्ही मुलींच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की, उद्धव ठाकरेंच्या नावाला सर्वात मोठा विरोध त्यांचाच होता. ज्यांना कुठलाच अनुभव नाही आणि ज्यांना पक्ष चालवता येत नाही त्यांना तुम्ही मुख्यमंत्री कसं करता हे तुम्ही शरद पवारांना विचारलं नव्हतं का?" असा सवाल त्यांनी केला.
 
 
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊतांनी स्वत: मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करणं सुरु केलं होतं. तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर मी मातोश्रीतील आतल्या बातम्या बाहेर सांगणं सुरु करेन. तुम्ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली याबद्दलचे कागदपत्र बाहेर देईल, अशा धमक्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना दिल्या होत्या. त्यांनी थेट शरद पवारांनाही जाऊन सांगितलं की, तुम्ही माझंच नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा. तसेच संजय राऊतांचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवा यासाठी सामनाच्या कार्यालयातून किती आमदारांना फोन गेले होते?" असा सवालही त्यांनी यावेळी केला.