पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे उद्या एका मंचावर!

शिवतीर्थावर ऐतिहासिक सभा; महायुती करणार शक्तिप्रदर्शन

    16-May-2024
Total Views |
modi

मुंबई
: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, मुंबईसह महानगर प्रदेशात दि. २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील महायुतीच्या सहा उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे संयुक्त सभा घेणार आहेत. शुक्रवार, दि. १६ मे रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर ही सभा होणार आहे.

श्रोत्यांच्या मनाचा अचूक ठाव घेण्याचे कसब लाभलेले हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र सभा घेत असल्यामुळे मुंबईसह आसपासच्या परिसरात त्याचा प्रभाव पडणार आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घाटकोपरमधील 'रोड शो'मुळे वातावरण ढवळून निघाले आहे. मुंबई मोदीमय झाल्याचे चित्र जागोजागी दिसू लागल्याने महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ झाले आहेत.

शुक्रवारी शिवतिर्थावर होणाऱ्या 'मोदी-राज' सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीमधील घटकपक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभेत एकत्र येणार असल्याने शिवतीर्थावर हिंदुत्वाचा बुलंद आवाज घुमणार असल्याचा प्रचार मनसेकडून केला जात आहे.

'मोदी-राज'कडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

मनसेसह भाजप आणि शिवसेनेकडून या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. जवळपास दोन लाखांची गर्दी जमविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मुंबईतील प्रत्येक विभागातून गाड्या सोडल्या जाणार आहेत. दरम्यान, महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आणि मोदी पहिल्यांदाच एकत्र येत असल्यामुळे ते काय बोलतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. इंडी आघाडीने अलिकडेच या मैदानावर सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएला ललकारले होते. त्यामुळे मोदी त्यांचा खरपूस समाचार घेतील, असे आडाखे बांधले जात आहेत.