घाटकोपर दुर्घटनेवरुन राजकारण तापलं! होर्डींगचा मालक ठाकरेंच्या घरात; भाजपचा आरोप
14-May-2024
Total Views |
मुंबई : सोमवारी घाटकोपरमध्ये वादळी पावसामुळे होर्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला. दरम्यान, या होर्डींगचा मालक भावेश भिडे याचा उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. त्यामुळे या दुर्घटनेवरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. तसेच उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत आणि भावेश भिडेचा एक फोटोही सध्या व्हायरल होत आहे.
14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात..
भाजप नेते राम कदम यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर भावेश भिडे आणि उद्धव ठाकरेंचा एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये राम कदम म्हणाले की, "१४ लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात.. मनाला चीड आणणारे हे चित्र.. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होते.. टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर.. आजही १४ लोकांचे नाहक बळी घेत आहेत.. कुठे फेडणार हे पाप..?" असा सवाल त्यांनी केला आहे.
सोमवार, १३ मे रोजी मुंबईत अचानक आलेल्या वादळी पावसामुळे हाहाकार उडाला होता. यातच घाटकोपर परिसरात वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर होर्डींग कोसळून त्यात १४ लोकांचा मृत्यू झाला. या होर्डींग कंपनीचा मालक भावेश भिडे हा फरार झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, याबाबत एक एक माहिती उघड होताना दिसत आहे. हे होर्डींग बेकायदेशीर असून महापालिकेने याआधीच ते हटवण्याचे आदेश दिले होते. परंतू, होर्डींग मालकाने ते हटवले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.