जय भोलेनाथ! केदारनाथ धाम येथून महत्त्वाची अपडेट

    10-May-2024
Total Views |

Kedarnath Dham

मुंबई (प्रतिनिधी) :
अकरावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड येथील केदारनाथ धामचे (Kedarnath Dham) दरवाजे शुक्रवार, दि. १० मे रोजी पहाटे उघडण्यात आले. बाबा केदारनाथच्या जयघोषात आणि लष्कराच्या ग्रेनेडियर रेजिमेंटच्या बँडच्या भक्तिमय सूरांमध्ये विधीवत पद्धतीने दरवाजे उघडण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.

हे वाचलंत का? : भारत संरक्षण सामग्रीच्या क्षेत्रातही लवकरच बनणार आत्मनिर्भर!

याप्रसंगी बाबा केदारनाथचे संपूर्ण मंदिर २० क्विंटलहून अधिक फुलांनी मंदिर सजवण्यात आले होते. दरवाजे उघडताना हेलिकॉप्टरमधून यात्रेकरूंवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मंदिर परिसरात भाविकांसाठी ठिकठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवाजे उघडण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून गुरुवार, दि. ९ मे रोजी सायंकाळी भगवान केदारनाथची पंचमुखी उत्सव मूर्ती पंचकेदार गद्दी स्थळ श्री ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथून गुप्तकाशी, फाटा, गौरीकुंड अशा विविध ठिकाणांहून श्री केदारनाथ धाम येथे पोहोचली.

Pushkar Singh Dhami

शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून यात्रेकरूंच्या आगमनाची प्रक्रिया मंदिर परिसरात व दर्शन रांगेत सुरू झाली होती. रावल धर्माचार्य व पुरोहितांनी द्वारपूजनाला सुरुवात केली. भगवान भैरवनाथ आणि भगवान शिव यांचे आवाहन करून सकाळी ठीक सात वाजता श्री केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. दरवाजे उघडल्यानंतर भगवान केदारनाथच्या स्वयंघोषित शिवलिंगाला समाधी स्वरूपात सुशोभित करण्यात आले. त्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली. शनिवार, ११ मे रोजी श्री केदारनाथ धाममधील श्री भकुंत भैरव मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर श्री केदारनाथ मंदिरात रोजच्या आरत्या आणि सायंकाळच्या आरत्या सुरू होतील.