मुंबईतील गिर्यारोहकांसाठी आनंदवार्ता! पुन्हा एकदा सुरू होणार 'अरुण सामंत क्लाइंबिंग वॉल'

    30-Apr-2024
Total Views |

Climbing wall 
 
मुंबई : मुंबईतील गिर्यारोहण प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गोरेगाव येथील नंदादीप विद्यालयाच्या प्रांगणात पुन्हा एकदा 'अरुण सामंत क्लाइंबिंग वॉल' सुरू होणार आहे. रविवार, २८ एप्रिल रोजी या क्लाइंबिंग वॉलचा उद्घाटन सोहळा पार पडला.
 
अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ, कांगचेंनजुंगा माऊंटेरींग फाउंडेशन आणि माऊंटेन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 'अरुण सामंत क्लाइंबिंग वॉल' पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमात याच वॉलवर प्राथमिक धडे गिरवून छत्रपती शिवाजी महाराज हा प्रथम पुरस्कार पटकावणाऱ्या सिद्धी मणेरिकर उपस्थित होत्या. तसेच महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लाइंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर एम. पी. यादव, कांगचेंनजुंगा माऊंटेरींग फाउंडेशनचे चारूहास जोशी, वसंत लिमये, दिलीप लागू आणि माऊंटेन स्पोर्ट्स अकॅडमीचे नंदू चव्हाण हे उपस्थित होते.
 

Climbing wall 
 
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लाइंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर एम. पी. यादव यावेळी म्हणाले की, क्लाइंबिंग हा एक खेळ आहे. खेळ. म्हटलं की, स्पर्धा आणि नियम आलेच. पण यासोबतच खेळामध्ये सुरक्षादेखील अत्यंत महत्वाची आहे," असे ते म्हणाले.
 
यावेळी क्लाइंबिंग वॉल प्रत्यक्षात साकारणारे आणि अरुण सामंत यांचे भाऊ गिरीश सामंत यांनी या वॉलबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, "ही भिंत २००३ मध्ये उभी राहिली. ४३ फूट उंच असलेली ही भिंत केवळ दीड इंच जाड आहे. या भिंतीने आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू घडवले आहेत. मात्र, १३ वर्षांनंतर एका अपघातामुळे आणि अन्य काही कारणांमुळे ही वॉल बंद झाली. त्यानंतर आता ही वॉल पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे."
 
या कार्यक्रमाच्या मान्यवर असलेल्या सिद्धी मणेरिकर यांनी या खेळाच्या माध्यमातून जवळपास ८ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तसेच विविध संस्था आणि शाळांमध्ये त्यांना क्लाइंबिंग प्रशिक्षक म्हणूनही निमंत्रित करण्यात येतं. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की, "ज्या शाळेतील वॉलकडून मला स्पोर्टस क्लाइंबिंगचं बाळकडू मिळालं ती वॉल आज पुन्हा सुरू होत आहे याचा फार आनंद होतोय. मी सातवीत असताना मला स्पोर्ट्स क्लाइंबिंगविषयी काहीच कल्पना नव्हती. हळूहळू मी या क्षेत्रात पुढे जात गेली. परंतू, 'अरुण सामंत क्लाइबिंग वॉल' ही वास्तू आज उभी नसती तर मला या खेळाची ओळख झाली नसती. माझ्या प्रगतीमध्ये या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे," असे त्या म्हणाल्या.