उन्हाळ्याचा कडाका आणि आरोग्याची काळजी

    29-Apr-2024
Total Views |
 SUMMER
 
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे कोल्डड्रिंक्स, आईस्क्रीम, सरबते व अन्य थंड पदार्थांचा शरीरावर होणारा मारा! शरीरामध्ये अति उष्णतेमुळे होणारी तगमग कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काहीना काही उपाय करत असते. हल्ली तापमान ही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. उष्णतेच्या लाटांचा तडाखा प्रत्येकाला सोसावा लागतोय. वातानुकूलित खोलीमध्ये बसल्यावर बरे वाटते, पण त्याचेही विपरीत परिणाम शरीरावर होत असतात. त्यामुळे सध्याच्या सुट्टीच्या आणि आंब्याच्या सिझनमध्ये उन्हाळा कसा ‘एन्जॉय’ करावा, याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊया...
 
उन्हाळ्यामध्ये स्वाभाविकत:च शरीरोष्मा वाढतो आणि तो नियमित राखण्यासाठी, शरीराचे तापमान सर्वसाधारण पातळीवर कायम ठेवण्यासाठी घाम येणे, ही एक नैसर्गिक प्रक्रिया सुरु असते. दमट वातावरणात घाम जास्त येतो अणि कोरड्या प्रदेशात शरीर अधिक तापते. दोन्ही परिस्थितीत शरीरातील जलियांश/द्रवांश लवकर कमी होतो. म्हणून, वारंवार तहान लागते. बरेचदा नुसत्या पाण्याने समाधान होत नाही. मग विविध थंडपेय, पदार्थांचा शरीरावर मारा सुरु होतो. पण, aerated drinks मधून साखरेचे अति प्रमाणात सेवन केले जाते व त्यातील अन्य घटकांचाही पोटाच्या आतड्यांना त्रास होतो. यापेक्षा विविध फळांचे रस, सरबते यांचे सेवन करावे. उदा- आवळ्याचे सरबत, कोकमाचे सरबत, कैरीचे पन्हे, लिंबू सरबत तसेच गुलकंदही पाण्यात किंवा दूधात घालून प्यायल्यास शरीराला थंडावा जाणवतो.
 
बडीशेप थोडा वेळ पाण्यात भिजवावी व त्यात खडीसाखर घालून प्यावी. तसेच धणे-जिर्याचे ही करावे. वाळ्याचे सरबत ही उन्हाळ्यात अतिशय लाभदायी आहे. कोहळ्याचा रसदेखील शरीरातली उष्णता कमी करण्यास मदत करतो. वरील सांगितलेल्या सरबतांमुळे फक्त तहानच भागत नाही, तर त्याचबरोबर तृप्ती आणि थंडावाही जाणवतो. थकवा लवकर भरुन येतो. सरबतांमधून थोडी साखर व किंचित मीठ असल्याने शरीरातील 'electrolyte balance' ही कायम राखायला व्हायला मदत होते. यामुळे गळून जाणे, त्राण नसणे अशी लक्षणेदेखील लगेच कमी होतात.
 
पण, काही विशेष काळजी उन्हाळ्यात घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुपारी १२ ते ४ चे ऊन आवर्जून टाळावे, ज्या खोलीत बसाल त्या खोलीत खेळती हवा असावी. बंदिस्त खोलीत अधिक जीव कासावीस होतो. खोलीतील प्रकाश मंद करावा. खिडक्यांना जाड कॉटनच्या पडद्यांनी बंद करावे. वाळ्याचेही पडदे जर मिळत असतील, तर ते खिडकीवर बांधावे व त्यावर पाण्याचा हबका मारावा, शिंपडावे. याने त्या खोलीत गारवा तर जाणवतोच, पण त्याचबरोबर वाळ्याच्या मंद सुगंधाने मनही प्रसन्न व शांत होते.
 
उन्हाळ्याच्या दिवसात सुती कपडे घालावेत. खूप घट्ट कपडे घालू नयेत. हलक्या रंगाचे, पेस्टल शेड्सचा वापर अधिक करावा. अति घाम येत असल्यास सकाळ-संध्याकाळ अंघोळ करावी. उन्हामुळे केवळ त्वचा रापतच नाही र्(sun tan), तर भाजतेही व त्याचबरोबर कोरडीही पडते. हे टाळण्यासाठी खूप स्ट्राँग साबण वापरणे टाळावे. त्वचेला नारळाचे दूध, गाईच्या दूधाची साय यात उटणे भिजवून त्याने अंघोळ करावी, असे केल्याने त्वचा मऊ-मुलायम राहते व यामुळे त्वचेला एक मंद सुगंध येतो.
 
उन्हाळ्यात स्वाभाविकत: घन आहार कमी सेवन केला जातो. जे खाऊ ते खूप तिखट, मसालेदार, खारट असू नये. हे जर पाळले नाही, तर नाकावाटे/गुदावाटे व अन्य प्रकारे रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. उन्हातून आल्या-आल्या लगेच पाणी पिऊ नये. आधी थोडा वेळ बसावे. हात-पाय धुवावेत. चेहर्यावर पाणी मारावे आणि मग गुळाचा खडा/खडीसाखर थोडी चोखून/खाऊन मग पाणी प्यावे. उभ्याने पाणी कधीच पिऊ नये. आपल्याला जी तहान लागते, ती तोंडात व घशात कोरडपणे या स्वरूपाची असते. पाणी पितानाही पाण्याच्या भांड्याला तोंड लावून घोट घोट पाणी प्यावे. ओठांना, तोंडाच्या आत, घशाला पाण्याचा जितका संपर्क जास्त काळ टिकतो, तेवढी तहान लवकर शमते.
 
बरेचदा उन्हाळ्यात शरीरातील द्रवांश कमी होतो. मनुष्य शरीरात बहुतांशी द्रव असले, तरी उन्हाळ्यात डिहायड्रेशनची शक्यता खूप अधिक वाढते. याची विविध कारणे आहेत. पाणी कमी पिणे किंवा शरीरातून जलीयांशाचे अधिक प्रमाणात बाहेर निघणे. 'Excess Water Loss'चीही काही कारणे सर्वसामान्यपणे दिसतात. जसे अधिक शारीरिक कष्ट व श्रम केल्यावर, अधिक व्यायाम केल्यास, उन्हाळ्यात अतिमद्यपान केल्यास, विशिष्ट आजारांवरील औषधे अधिक काळ घेतल्यास, काही व्याधींमध्ये देखील (जसे उलट्या, जुलाब होणे इ.) शरीरातील जलीयांशाचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशनची शक्यता वाढते.
 
शरीरातील जलीयांश कमी झाले, हे कसे ओळखावे? याची खालीलप्रमाणे लक्षणे असतात- वारंवार तहान लागणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, लघवीचा रंग बदलणे, अस्वस्थता व बैचेनी जाणवणे, डोके दुखणे, अन्नावरची वासना नसणे, भूक कमी होणे, मळमळणे, कुठल्याही गोष्टीचे लगेच आकलन न होणे, संभ्रमावस्था निर्माण होणे, खूप गळून गेल्यासारखे-थकल्यासारखे वाटणे, वारंवार जलीयांशाची कमतरता होऊ लागली, तर नखांचाही रंग बदलतो (Purpulish), त्वचा आणि मुख प्रदेशी खूप कोरडेपणा जाणवतो. क्वचित प्रसंगी आकडीही येऊ शकते.
 
या लक्षणांमध्ये काही विशिष्ट कारणांनी अधिक वाढ होऊ लागते. जसे की, उलट्या-जुलाब होऊ लागल्यास याने शरीरातील जलीयांश प्रचंड प्रमाणात शरीराबाहेर टाकले जाते व त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. गरजेपेक्षा कमी पाणी पिणे, खूप घाम येणे व शारीरिक व अंगमेहनत दमट व गरम वातावरणात केल्याने वरील लक्षणे उत्पन्न होण्याची शक्यता वाढते. लहान मुलांमध्ये, गर्भिणी अवस्थेतील महिलांमध्ये, वृद्धांमध्ये ही लक्षणे लवकर वाढू शकतात. तसेच अधिक उंचीवरील प्रदेशामध्ये वास्तव्य असणार्या व्यक्तींमध्ये देखील लक्षणांची तीव्रता अधिक वाढू शकते. उष्णतेमध्ये (उन्हात किंवा BIG KITCHEN) ज्यांचे काम असते, त्यांनी ही काळजी घेणे अत्यंत गरजचे असते. सांघिक मैदानी खेळ किंवा अॅथलिट यांनीदेखील या ऋतूमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
 
उन्हाच्या तीव्रतेपासून रक्षण करणे, हे महत्त्वाचे आहे. संपूर्ण अंगभर हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करावेत. डोक्यावर पांढरी टोपी परिधान करावी, डोळ्याला गॉगल असावा, पायात प्लास्टिकची चप्पल/ पादत्राणे घालू नयेत. त्याने उष्णता अधिक शरीरात खेचली जाते. अशा गरमीत छत्री वापरणे केव्हाही योग्यच आहे. अंगावर चंदनाचा लेप, वाळ्याचे पाणी, गुलाब पाण्याच्या घड्या ठेवाव्यात (कपाळावर, डोळ्यावर, पोटावर) पायाच्या तळव्यांना तेल लावावे. शरीरातील उष्णता अधिक वाढू देऊ नये. तळलेले पदार्थ, पचायला जड पदार्थ, ज्यांनी शौचास खडा होईल, मलबद्धता होईल असे पदार्थ टाळावेत.
 
'PREVENTION IS BETTER THAN CURE'हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवावे. साळीच्या लाह्यांचे पाणी साखर घालून प्यावे. त्याने थंडावाही मिळतो आणि ताकदही मिळते. तेव्हा स्वतःची काळजी घ्यावी आणि उन्हाळ्यातील सुट्टीचा आनंद लुटा.
 
 
वैद्य कीर्ती देव 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९