‘स्वरगंधर्व सुधीर फडके’; चरित्रपटाच्या माध्यमातून होणार सुरेल संस्कार

Total Views |
biopic-swargandharva-sudhir-phadke


‘आकाशी झेप घे रे पाखरा... सोडी सोन्याचा पिंजरा’. खरेच महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मराठी कुटुंबातील लहान मुलांवर बाबूजींच्या अर्थात सुधीर फडके यांच्या गाण्यांचे संस्कार झाले आहेत. त्यांचे प्रत्येक गाणे आपल्याला जीवनाचा नवा अर्थ समजावून जाते, असे म्हटले तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. याच महाराष्ट्राच्या अजरामर कलावंताचा संगीतमय चरित्रपट ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ १ मे, महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश देशपांडे आणि चित्रपटात बाबूजी आणि ललिताबाई साकारणारे सुनील बर्वे आणि मृण्मयी देशपांडे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला सुसंवाद.

सुरांची जाण असलेल्या सुनील बर्वेंची बाबूजींच्या व्यक्तिरेखेसाठी केलेली निवड कशी झाली, आणि त्याबद्दल स्वतः सुनीव बर्वे यांना काय वाटते, हे सांगताना आणि ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात बाबूजींची भूमिका साकारणार, असे समजले त्यावेळी मनात आलेल्या भावना व्यक्त करताना सुनील बर्वे म्हणाले की, “दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी मला मी बाबूजींच्या रूपात कसा दिसणार याचे स्केच दाखवले होते. त्यावेळी ‘अरे! मी बाबूजी दिसू शकतो’ ही पहिली माझी प्रतिक्रिया होती. त्यानंतर, आम्ही वयवर्ष ४० ते ८० हा वयोगट माझ्यावर वेशभूषा, केशभूषा आणि मेकअपच्या साहाय्याने साकारून पाहिला आणि मग किमान बाबूजींच्या जवळपास जात आहे असे मलादेखील एक नट म्हणून वाटले.”

या चित्रपटात ललिताबाई सुधीर फडके यांची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने “ते स्केचबूक पाहिले देखील नव्हते,” असे ती म्हणाली. मला केवळ ललिताबाईंचा फोटो दाखवला होता. आणि मला सांगण्यात आले की, तुझ्यात आणि ललितबाईंच्या दिसण्यात साम्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दिग्दर्शकांनी आम्हाला सांगितले होते, जरी चरित्रपट असला, तरी कुठल्याही प्रकारची नक्कल करायची नाही. कारण, त्या व्यक्तीसारखे दिसणे आणि असणे हे फार महत्त्वाचे आहे,” असे मृण्मयी म्हणाली.

बाबूजींची भूमिका साकारण्यापूर्वी एक अभिनेता म्हणून अभ्यास कसा केला, हे सांगताना सुनील बर्वे म्हणाले, “बाबूजींबद्दल अनेकांनी त्यांची मते लिहून ठेवली आहेत. तर, त्यांच्याविषयी अनेक दिग्गजांनी केलेल्या लिखाणातून, मी मुळात एक माणूस म्हणून बाबूजी कसे होते? त्यांचा स्वभाव कसा होता? त्यांची लोकांशी बोलण्याची शैली कशी होती, हे सगळे अभ्यासले,” असा पूर्वतयारीचा अनुभव त्यांनी सांगितला.

रा. स्व. संघाचे बाबूजींच्या जीवनातील महत्त्व सांगताना सुनील बर्वे म्हणाले, “बाबूजी मुंबईत आल्यापासूनच त्यांचा खडतर प्रवास सुरू झाला होता. गाणी गाऊन ते स्वत:चा उदरनिर्वाह करत होते. अशा कठीण प्रसंगात रा. स्व. संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी त्यांना मदत केली होती, आणि स्वयंसेवकांच्या मदतीमुळे ते कलकत्त्यापर्यंत पोहोचले होते. बाबूजींना त्यांच्या जीवनातील पहिले गाणे मिळेपर्यंत संघानेच साथ दिली होती. याशिवाय, संघाची अनेक गाणी बाबूजींनी संगीतबद्ध केली होती. तसेच, चित्रपटात बाबूजी आणि रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची भेट पाहायला मिळणार आहे. शिवाय, संघासाठी बाबूजींनी केलेले कार्यदेखील प्रेक्षकांना ‘याची देही याची डोळा’ अनुभवता येणार आहे,” असेदेखील बर्वे म्हणाले.
 
बाबूजी आणि ललिताबाईंच्या भूमिकेने काय दिले, हे सांगताना सुनील आणि मृण्मयी म्हणाले, “बाबूजींच्या गाण्यांनी आपल्यावर बालपणापासून संस्कार केले आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने आमच्यावर एक कलाकार म्हणूनही संस्कार झाले. पण, बाबूजींची व्यक्तिरेखा जगल्यानंतर संगीत क्षेत्रातील समर्पण, देशप्रेम अशा अनेक गोष्टी मी आत्मसात केल्या.” तर मृण्मयीने, “या चित्रपटाने मला पडद्यावर का होईना, पण फडके कुटुंबात सामील होण्याची संधी दिली त्याचा आनंद आहे,” असे म्हटले.



रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.