मराठी भाषा शिकण्यासाठी मी प्रयत्नशील - अमिताभ बच्चन
मुंबई : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार बुधवार दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृह येथे संपन्न झाला. दरवर्षी याच दिवशी संगीत, नाटक, कला, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अमिताभ बच्चन यांनी, “ज्यावेळी योग्य सुर लागतो तेव्हा आपली आत्मा परमात्म्याशी जोडली जाते. आणि आपल्याला परमात्म्याशी जोडणारी ही दोरी म्हणजे लता मंगेशकर यांचा स्वर”, असे म्हणत (Amitabh Bachchan) आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी अमिताभ बच्चन यांनी मराठी भाषा शिकण्याचा माझा प्रयत्न सुरु असल्याची जाहिर कबूली दिली. ते म्हणाले, "सुरुवातीला प्रचंड कामं असल्यामुळे मराठी भाषा शिकायला वेळ मिळाला नाही. पण आता वयोमानामुळे वेळ आहे आणि त्याचा सदुपयोग करत असून मराठी भाषा शिकण्यासाठी मी प्रयत्नशील आहे", असे आश्वासन देखील अमिताभ बच्चन यांनी दिले.
यंदा लता मंगेशकर पुरस्काराचे हे तिसरे आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे ३४वे वर्ष आहे. लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत मांडताना अमिताभ बच्चन म्हणाले की, “लता मंगेशकर पुरस्कार मला प्रदान केला ही माझ्यासाठी फार सौभाग्याची बाब आहे. लता मंगेशकर यांचा सहवास आणि त्यांचे प्रेम माझ्या कुटुंबाला कायम लाभले. जितका आदर आणि सन्मान त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबीयांना दिला आहे त्याचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही", अशा नम्र शब्दांमध्ये अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वडिलांनी कवी हरिवंशराय बच्चन यांनी लता मंगेशकर म्हणजे मधाची धार होत्या असे त्यांचे वर्णन आठवण स्वरुपात सांगितले. पुढे ते असं देखील म्हणाले की, “गोडवा त्यांच्या गाण्यात मधासारखा आहे कारण मधाची लय कधी तुटत नाही तसाच लता मंगेशकर यांचा सुर कधी तुटत नाही", अशी सुरेल आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितली.
लता मंगेशकर पुरस्काराचे पहिल्या वर्षीचे मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते. तर दुसऱ्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
लता मंगेशकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची यादी
- लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- पद्मविभूषण श्री. अमिताभ बच्चन
- मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- ए आर रहमान (प्रदीर्घ संगीत सेवा) - मोहन वाघ पुरस्कार- नाटक गालिब (उत्कृष्ट नाट्यनिर्मिती २०२३-२४) -आशा भोसले पुरस्कृत आनंदमयी पुरस्कार- यजुवेंद्र महाजन, दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल (समाजसेवा)
-वाग्विलासिनी पुरस्कार- मंजिरी फडके (प्रदीर्घ साहित्य सेवा)
- मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- अशोक सराफ (प्रदीर्घ नाट्य-चित्रपट सेवा)
-मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- पद्मिनी कोल्हापुरे (प्रदीर्घ चित्रपट सेवा)
- मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- रुपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा)
-मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- अतुल परचुरे (प्रदीर्घ नाट्यसेवा) -मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- रणदीप हुड्डा (उत्कृष्ट चित्रपट निर्मिती)
-विशेष पुरस्कार - मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- भाऊ तोरसेकर (प्रदीर्घ पत्रकारिता)