“मी माझ्या खर्चाने..” राहूल गांधीनी सावरकर चित्रपट पाहावा म्हणून देवेंद्र फडणवीसांची खास ऑफर

    01-Apr-2024
Total Views |
“आजच्या कर्मशिअल चित्रपटांच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट काढणं म्हणजे कौतुकास्पद”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले रणदीप हुड्डाचे कौतुक.
 

devendra fadnavis 
 
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित या हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित करण्यात आला. २९ मार्च रोजी मराठीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या विशेष शोसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली होती. यावेळी फडणवीस यांनी चित्रपटाचे कौतुक करत राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना टोला देखील लगावला.
 
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत राहूल गांधींना एक ऑफर दिली. ते म्हणाले, “राहुल गांधी हा चित्रपट पाहायला येत असतील मी संपूर्ण थिएटर बूक करेन आणि त्यांना एकट्याला हा चित्रपट पाहण्याची व्यवस्था करेन. राहुल गांधींनी सावरकर वाचले नाहीत. म्हणून त्यांना सावरकर कळले नाहीत. त्यामुळे ते सावरकरांविरोधात गरळ ओकत असतात. मी निश्चित रुपाने त्यांना आवाहन करतो की राहुल गाधींनी सावरकर हा चित्रपट पाहावा. ते चित्रपट पाहू इच्छित असतील तर मी माझ्या खर्चाने त्यांना चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बूक करेन”, अशी खास ऑफरही देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना दिली.
 
 
 
तसेच, पुढे ते म्हणाले की, “मी रणदीप हुड्डांचं मनापासून अभिनंदन करेन. त्यांनी सावरकरांवर सत्य सांगणारा चित्रपट आणला. काँग्रेसी आणि डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी सर्वांत जास्त अन्याय स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केला. परंतु, त्यांची खरी कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप हुड्डांनी आपल्यापर्यंत आणली. शिवाय मराठीतही हा चित्रपट आणला. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की देशाचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हा चित्रपट पाहिलाच पाहिजे.”
 
पुढे ते असं देखील म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकारांचं चरित्र ३६० अंशात आहे. अत्यंत बुद्धीमान व्यक्ती, लिडर आणि नीडर स्वातंत्र्यसेनानी, समाजसेवक, जातीप्रथेच्या विरोधात लढणारे सुधारक, मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक असे अनेक कंगोरे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामान्य माणसाला प्रेरणा देत त्यासोबत भारतीय संस्कृती, हिंदुत्व अशा अनेक संकल्पना समाजासमोर आणण्याचाही प्रयत्न केला”.
 
देवेंद्र फडणवीस यांनी रणदीप यांचे कौतुक करत म्हटले, “आजच्या कमर्शिअल युगात असा चित्रपट बनवण्याची संकल्पना विलक्षण आहे. रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे यांनी या दोन्ही भूमिकांना योग्य न्याय दिला असूनआपण त्या कालखंडात पोहोचलो आहोत असं नक्कीच वाटतं”.