"अनिल परब यांना अटक होणार!"

भाजप नेते किरीट सोमय्यांचा दावा

    01-Apr-2024
Total Views |
 
Anil Parab
 
रत्नागिरी : साई रिसॉर्ट प्रकरणी उबाठा गटाचे नेते अनिल परब यांना अटक होणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. ते सोमवारी अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणाच्या कारवाईबाबत पाठपुरावा करण्यासाठी रत्नागिरीमध्ये होते. यावेळी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी अनिल परब यांना अटक होणार असल्याचे म्हटले आहे.
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "अनिल परब आता व्यवस्थित अडकले आहेत. रिसॉर्ट त्यांनी बांधला, जमीन त्यांनी घेतली आणि मी अनधिकृत रिसॉर्ट बांधला आहे, हे त्यांनी मान्य केलं. त्यामुळे अनिल परब यांच्यावर ताबडतोब कारवाई सुरु होणार आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "गल्लीतल्या काडीपैलवानानं हिंदकेसरीला ललकारण्याचं स्वप्न पाहू नये!"
 
ते पुढे म्हणाले की, "अनिल परब आतापर्यंत 'तो मी नव्हे' असे म्हणत नाटक करायचे. पण त्यांनी स्वत:च्या नावाने परवानगी घेऊन रिसॉर्ट बांधला. त्यांच्यावर आता ७ गुन्हे दाखल आहेत. यातला एक गुन्हा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात कबुल केला. त्यामुळे आता 'चोरी पकडी गयी, माल वापस देता हू' असं म्हणून घरी बसता येणार नाही. त्यांना जेलमध्ये जावंच लागेल," असेही ते म्हणाले आहेत.
 
अनिल परब यांचे दापोली येथील साई रिसॉर्ट नियमांचा भंग करून बांधल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. हे रिसॉट अनिल परब यांच्या मालकीचे असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सोमय्यांनी केली होती. त्यानंतर आता ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून लवकरच अनिल परब यांना अटक होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.