राजा प्रवरसेनाचे महाकाव्य ‘सेतूबंध’

    30-Mar-2024
Total Views |
Raja Pravarasena Setubandha


वाकाटक घराण्यातील इ. स. पाचव्या शतकातील महाराष्ट्री वैदर्भीय राजा प्रवरसेन (द्वितीय) याचे महाराष्ट्री प्राकृत महाकाव्य ‘सेतूबंध’ हे एका राजाने त्रेतायुगातील दुसर्‍या राजाची म्हणजे राजा रामाची गायलेली पराक्रमी यशोगाथा आहे. ‘सेतूबंध’चे १५ आश्वास असून संस्कृत कवी बाण, दंडी आर्दिनी यांनी या काव्याची प्रशंसा केली आहे. रामकथा वर विपुल वाङ्मयातील महाराष्ट्री प्राकृत भाषेतील पहिली ‘रामकथा’ म्हणून ‘सेतूबंध’चे वाङ्मयीन इतिहासात अग्रणी स्थान आहे, त्याविषयी...

कीर्तिः प्रवरसेनस्य प्रयाता कुमुदोज्ज्वला।
सागरस्य परं पारं कपिसेनेय सेतुना॥
 
अभिजात संस्कृत महाकवी बाण यांनी ’हर्षचरित’मध्ये राजा प्रवरसेन (द्वितीय) याची उपरोक्त श्लोकाद्वारे स्तुती गायलेली आहे. राजा प्रवरसेन (द्वितीय) हा आपल्या विदर्भातील वाकाटक राजघराण्यातील इ. स. ४१५ ते ४५५ या काळात होऊन गेलेला महाकवी राजा. नागपूर जवळील मानसर येथे राजधानी होती, त्याला ’प्रवरपुरा’ असे नाव होते. प्रवरसेन (द्वि.) याने सुमारे ३०-४० वर्षे राज्य केले. राज्यात शांती व समृद्धी असल्यामुळेच त्याला अयोध्येचा राजा रामचंद्रावर महाकाव्य लिहिण्याची प्रेरणा व सवड मिळाली. राजा प्रवरसेन (द्वि.) याने लिहिलेले ’सेतूबंध’ महाकाव्य हे प्राकृत महाराष्ट्रीमधील पहिली ’रामकथा’ होय. आजवर ऋषी, मुनी, संत, कवींनी रामकथा गायली होती. पण, पाचव्या शतकातील एका राजाने, त्रेतायुगातील नित्यविजयी रघुनंदन राम राजाची गायलेली वीरगाथा म्हणजे ’सेतूबंध’ महाकाव्य होय! एका राजाने दुसर्‍या राजाचे केलेले यशोगान! राजा प्रवरसेन (द्वि)चे ’सेतूबंध’ हे महाकाव्य महाराष्ट्रभूमीत लिहिले गेलेले प्राकृत भाषेतील पहिले महाकाव्य, पहिली रामकथा- रामायण म्हणून त्याचे विशेष महत्त्व आहे. ’सेतूबंध’ महाकाव्याला, ’रावणवहो’ अर्थात ’रावणवध’, ’दशमुखवध’ अशा नावानेही ओळखले जाते.


या महाकाव्याचे १५ आश्वास आहेत. (आश्वास म्हणजे सर्ग, अध्याय) ’वाल्मिकी रामायण’ हेच राजा प्रवरसेनाच्या महाकाव्याचे प्रेरणास्थान असले, तरी राजा प्रवरसेनच्या ’सेतूबंध’ महाकाव्याची सुरुवात थेट ‘वाल्मिकी रामायणा’तील किष्किंधा कांडातील वाली वधापासून होते आणि रावणवधाने पूर्णावते. वाली वध ते रावणवध अशी ही श्रीरामांच्या परमपुरुषार्थी पराक्रमाची वीरगाथा आहे. या महाकाव्याची प्रस्तुत छोट्या लेखाच्या मर्यादेत ओळख करून घेण्यापूर्वी राजा प्रवरसेन (द्वि.) याची महाराष्ट्री महाकवी राजा म्हणून थोडी व्यक्तिगत माहिती आपणास असणे अगत्याचे आहे. राजा प्रवरसेन हा वाकाटक राजा रूद्रसेन आणि राणी प्रभावतीचा द्वितीय पुत्र. सम्राट चंद्रगुप्ताचा नातू. राणी प्रभावती ही सम्राट चंद्रगुप्ताची पराक्रमी कन्या आहे. पती रुद्रसेनच्या मृत्यूनंतर मुले मोठी होईपर्यंत तिने वाकाटक राजगादीवर बसून राज्य केले. तिला दोन मुले होती. मोठा दिवाकर आणि धाकटा दामोदर. दिवाकराला युद्धात वीरमरण आल्यानंतर, तिने धाकटा मुलगा दामोदर याला राजपदी बसवले. हा दामोदर म्हणजेच महाकवी राजा प्रवरसेन (द्वि.)!

भारतीय इतिहासात प्रवरसेन नावाचे चार राजे होऊन गेले आहेत. पैकी दोन काश्मीरमध्ये झाले आणि दोन दक्षिण भारतात झाले. मानसरचा प्रवरसेन (द्वि.) त्यापैकी एक आहे. प्रवरसेनाचे आईवडील राजा रुद्रसेन व राणी प्रभावती हे दोघे वैष्णव संप्रदायी, विष्णुभक्त होते; पण स्वयं प्रवरसेन (द्वि.) थोर शिवभक्त होता. वैष्णव-शैव समन्वयवादी, सहिष्णू, पराक्रमी आणि कला-साहित्यप्रेमी विद्वान राजा म्हणून तो प्रजाजनांमध्ये प्रसिद्ध होता.राजा प्रवरसेन (द्वि)च्या ’सेतूबंध’ महाकाव्याचा मुख्य विषय श्रीरामाने वानरसेनेद्वारे समुद्रावर सेतू बांधण्याचा केलेला ’स्थापत्य पराक्रम’ आणि दशानन रावणासह अनेक दुष्टदुर्जन राक्षसांचा वध करण्याचा केलेला ’पुरुषार्थ’ हा असून, या वीररस परिलुप्त महाकाव्यात अनेक रसाचा परिपोष आहे. प्रवरसेनच्या या महाकाव्याचे महाकवी बाण, महाकवी दंडी तसेच कवी क्षेमेन्द्र आणि रामकथेचे आधुनिक संशोधक अभ्यासक डॉ. कामिल बुल्के अशा मान्यवरांनी कौतुक केलेले आहे. ’राजकमल अमर साहित्यमाला’द्वारे प्रवरसेनचे हे महाकाव्य हिंदीत पुस्तक रुपात प्रकाशित झालेले आहे. डॉ. रघुवंश यांची त्याला प्रस्तावना लाभलेली आहे. काही अभ्यासकांच्या मते, ’सेतूबंध’ हे महाकाव्य कवी कालिदासाचे असून, ते त्याने प्रवरसेनला अर्पण केले आहे. काहींच्या मते, हे काव्य प्रवरसेन व कालिदास दोघांची संयुक्त साहित्यकृती आहे. संस्कृत महाकवी कालिदास संस्कृतमध्ये लिहिण्याचे सोडून प्राकृतात काव्य कशाला लिहील? असेही विचार काहींनी व्यक्त केलेले आहेत. अशा मतमतांतरामध्ये कवी बाण आणि कवी दंडी यांचे मत अधिक निर्णायक व विश्वसनीय ठरते. दंडीने ’काव्यादर्श’मध्ये प्रवरसेनच्या ‘सेतूबंध’ महाकाव्याचे खालील श्लोकात वर्णन केलेले आहे.


महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृत विदुः।
सागरः सूक्तिरत्नानां सेतुबन्धादि यन्मयम् ॥१ः३४॥


’सेतूबंध’ महाकाव्याच्या पहिल्या आश्वास (अध्याय)चा शुभारंभ भारतीय परंपरेनुसार, राजा प्रवरसेनने ’मंगलाचरणा’ने केला असून भगवान विष्णू आणि भगवान शिवाची वंदना, प्रार्थना केलेली आहे. या काव्याची सुरुवात निसर्गरम्य अशा ऋतू वर्णनाने होते. शरद ऋतूचे वर्णनानंतर हनुमान आगमनाने रामकथेचा विषय सुरू होतो. द्वितीय आश्वासमध्ये समुद्र वर्णन आहे. पुढे अध्याय-तीनमध्ये सुग्रीव प्रोत्साहन व सुग्रीव आत्मोत्साह, अध्याय-चारमध्ये वानर सेनेची जमवाजमव व उत्साह वर्णन आहे. अध्याय-पाचमध्ये रामाची सागरास प्रार्थना, रामाचा रोप आणि धनुष्यारोप, सागराची संतुष्टी भाग आहे. अध्याय-सहामध्ये सागरामध्ये पूल बांधण्याची संकल्पना व तयारी, अध्याय-सातमध्ये सेतू निर्माणाचा श्रीगणेशा, वर्णन, अध्याय-आठमध्ये सुग्रीव चिंता, नलाची वीर दपोक्ती, सेतू निर्माण पूर्ण. अध्याय-नऊ ः सागर सेतूवरून वानरसेनेचा लंका भूमीवर प्रवेश. अध्याय-दहा ः सूर्यास्त वर्णन. अध्याय-११ रावणाची कामावस्था, रामाचे शीर (मायावी) पाहून सीतेचा शोक. १२व्या अध्यायात रामाची युद्ध सज्जता, १३व्या अध्यायात युद्धाच्या प्रारंभाचे वर्णन आहे आणि १४व्या आश्वासमध्ये राम-रावण युद्धाचे वीररसप्रधान वर्णन असून, रावण वधाने युद्धाचा शेवट होतो. बिभीषणला राज्य मिळते. १५व्या आश्वास मध्ये राम-सीतेची भेट आणि लंकेचा निरोप घेऊन अयोध्येकडे प्रस्थान येथे या महाकाव्याचा समारोप होतो. दुष्टांचा नाश करून राम- सीता भेटीच्या सुखांताने या महाकाव्याचा शेवट होतो.महाराष्ट्री प्राकृत भाषेतील, महाराष्ट्र भूमीतील राजाने केलेले महाकाव्य म्हणून ’सेतूबंध’चे वाङ्मयीन इतिहासात अग्रणी स्थान आहे.


-विद्याधर ताठे