मोदींनी केली 'भारतरत्न'ची घोषणा; 'या' तिघांना मिळाला सर्वोच्च सन्मान
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, नरसिंह राव यांच्यासह एमएस स्वामीनाथन भारतरत्न जाहीर
09-Feb-2024
Total Views | 104
नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि पीव्ही नरसिंह राव यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर याची घोषणा केली. यापूर्वी हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री जननायक कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान राम मंदिर आंदोलनाचे प्रणेते लालकृष्ण अडवाणी यांना देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन ही घोषणा केली. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, "देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते." त्यासोबतच त्यांनी पीव्ही नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन यांना देण्यात येणाऱ्या भारतरत्न पुरस्काराची घोषणा सुद्धा ट्विट करुन दिली.