रायबरेलीतूनही गांधी कुटुंबाचे पलायन ? सोनिया गांधी राज्यसभेत जाणार!

    13-Feb-2024
Total Views |
Sonia Gandhi To Rajya Sabha


नवी दिल्ली:
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याऐवजी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे आता राहुल गांधींनंतर सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून पलायन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यंदाची लोकसभा निवडणुक सोनिया गांधी या लढवणार नसून त्या राज्यसभेच्या मार्गाने खासदार होणार आहेत. त्यासाठी काँग्रेस पक्षाकडून आज त्यांचा अर्ज भरण्यात येणार असून त्या हिमाचल प्रदेश अथवा राजस्थानमधून खासदार होणार असल्याचे समजते. सोनिया गांधी यांच्या उमेदवारीविषयी काँग्रेसकडून चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत अर्ज भरताना काँग्रेस खासदार राहुल गांधीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता असून त्यासाठी ते मंगळवारी सायंकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील रायबरेली या लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधी गेल्या काही काळापासून निवडून येत आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसमधील गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गत लोकसभा निवडणुकीत भाजपने अतिशय नियोजनपूर्वक उत्तर प्रदेशातील अमेठी येथून राहुल गांधी यांचा पराभव घडवून आणला होता. अमेठीदेखील एकेकाळी गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जात असे. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी रायबरेलीतही काँग्रेसला धक्का देण्याची तयारी भाजपने केली आहे. परिणामी पराभव टाळण्यासाठी सोनिया गांधी यांनी राज्यसभेचा मार्ग पत्करल्याची चर्चा आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.