घनकचर्याचे प्रकार आणि तो नियंत्रित करण्यासाठीचे उपाय याविषयी आपण पाहिले आहेच. घनकचरा व्यवस्थापनासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विकरे. विकरांच्या साहाय्याने घनकचरा व्यवस्थापन कसे करायचे ते पाहू...
नव कितीही अविचाराने वागला तरी आपले सहचर जीव-जीवाणू मात्र आपल्या चुका दुरूस्त करायला उपयोगी पडतात. अलीकडच्या काळात शाश्वत पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन आणि कचर्याचे पुनर्चक्रीकरण करण्यासाठी विविध सूक्ष्मजीवांच्या विकारांच्या म्हणजेच ‘एन्झाइम्स’च्या मदतीने जैवउपचार तंत्र वापरून कचरा निर्मूलनाचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. निरनिराळ्या मानवी कृतींमुळे प्रचंड प्रमाणात घनकचरा निर्मिती होत असते त्यावर उपाय म्हणून इतके दिवस कचरा जाळणे, भूमीभरण क्षेत्रात दडपून टाकणे, त्याच्यापासून कंपोस्टिंगच्या साहाय्याने खत तयार करणे किंवा पायरोलायसिससारख्या तंत्राने त्याचे निर्मूलन करणे अशा विविध प्रयत्नांनी आपण घनकचरा व्यवस्थापन करण्याचे प्रयत्न करत आहोत.
परंतु, आता मात्र जागतिक स्तरावर सूक्ष्मजीवांपासून तयार केलेले विविध विकर वापरण्याचे तंत्र सुरू झाले आहे. या तंत्रात अगोदर कचर्याचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म तपासून त्याप्रमाणे हायड्रोलाएज, लायपेज, ऑक्सिडोरडक्टेज, ऑक्सिजनेज आणि लाक्केज, अमायलेज, झायलानेज, सेल्युलेज, इस्टरेज अशी विविध विकरे वापरून घातक कचर्याचे रूपांतर बिनविषारी किंवा जैवविघटनशील पदार्थ करण्याचा प्रयत्न साध्य झाला आहे. अर्थात, यासाठी जैवतंत्रज्ञान, नॅनो टेक्नोलॉजी, जनुक अभियांत्रिकी अशा अद्यावयत तंत्रज्ञान शाखांचा वापर करावा लागतो. कवक, काही वनस्पती आणि जीवाणू यांच्या मदतीने ही विकरे मिळवली जातात. काही जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने निर्मिली जातात.
घनकचरा व्यवस्थापन पद्धतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा जलद निचरा करण्यासाठी विकरांचा उपयोग अतिशय योग्य ठरतो. कारण, सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर परिणामकारक आणि निरुपद्रवी अशा पदार्थात करण्यात या विकरांचा महत्त्वाचा वाटा आहे. याखेरीज कचर्यापासून इतरही फायद्याची उप-उत्पादने निर्माण होतात, जसे बायोइथेनॉल, विघटनशील प्लास्टिक, पॉलीस्टर, बायोगॅस इत्यादी.
घराघरात रोज सकाळी येणारे ताजे वर्तमानपत्र संध्याकाळ झाल्यावर रद्दी होते. या रद्दीपासून विकरांच्या साहाय्याने त्यातील सेल्युलोजचा नाश करून त्यापासून ग्लुकोज रेणूंची निर्मिती करता येते, यासाठी सेल्युलोजचे पचन करणारी तीन सेल्युलेज प्रकारची विकरे वापरली जातात. सेलोबायो हायड्रोलेज, इंडोग्लुकानेज ही दोन विकरे ट्रायकोडर्मा रेसी या जीवाणूपासून निर्माण केली जातात, हे विकर अॅस्परजीलास अक्युलटस या कवकापासून निर्माण केले जाते. एन्झायमसमुळे रद्दी पेपरपासून उपयुक्त असे इथेनॉल बनवण्यास सुरुवात झाली आहे. या इथेनॉलचा वापर स्वच्छ इंधन म्हणून वाहनांत करता येतो. काही महत्त्वाची विकरे आणि त्याचा स्रोत यांची माहिती करून घ्यायची असेल, तर खालील तक्ता उपयुक्त ठरतो.
याशिवाय प्लास्टिक कचर्याची भस्मासुरी समस्यादेखील अशाच काही विकरांच्या साहाय्याने सोडवता येते. इस्टरेज, क्युटीनेज आणि पीएचबी डी-पॉलीमरेज या तीन विकरांचा वापर सर्वदूर पसरलेल्या घातक प्लास्टिक कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी करता येतो. त्यामुळे पर्यावरणस्नेही पद्धतीने प्लास्टिक प्रदूषणावर मात करता येते. बॅसिलस थुरीनजेनेसिस आणि बॅसिलस लायकेनिफॉर्मिस या अमायलेज पचन करणार्या दोन जीवाणू जाती 1:1 प्रमाणात मिसळून वापरल्यास खरकट्या अन्नाच्या टाकाऊ कचर्याची जलद गतीने विल्हेवाट लावता येते. बघा बरे, आपण मानव असूनही आपल्या समस्या सोडवायला शेवटी जीवाणू, कवक असेच जीव आपल्या मदतीला धावून येत आहेत.