'शिक्षणाची गाडी आली' जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम!

    12-Feb-2024
Total Views |
Janeev Charitable Trust news

मुंबई
: पालघर जिल्ह्यातील वनवासी पाड्यातील सकवार या जिल्हा परिषद शाळेत जाणीव चॅरिटेबल ट्रस्टने "शिक्षणाची गाडी आली" या उपक्रमांतर्गत आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल - कला व क्रीडा महोत्सव-२०२४ चे आयोजन केले होते. मुळात, अशा उपक्रमांमधून वनवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व शिक्षणाचे महत्त्व समजावे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. तब्बल १९८ शालेय विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि वीट भट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांनी यात सहभाग नोंदवला होता. या उपक्रमांतर्गत क्रिकेट, खो-खो, कबड्डी, लंगडी या मैदानी खेळांसोबतच कॅरम, बुद्धिबळ, हस्ताक्षर, नृत्य अशा मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक तारपा नृत्य व इतर गाण्यांवर नृत्य सादर करत सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या उपक्रमात जाणीव चॅरिटेबल ट्रस्टला अनेकांनी सढळ हस्ते आर्थिक सहाय्य केले. या कार्यक्रमासाठी विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातील (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) स्वयंसेवकांनी व आजी - माजी कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच सकवार या वनवासी पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. यापुढेही असेच शैक्षणिक, सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम दुर्लक्षित सामाजिक घटकांसाठी करत राहू अशी ग्वाही जाणीव चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी यांनी दिली.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.