भाजपच्या जागा वाढविण्यासाठी ताकद लावणार : आमदार केळकर

    27-Nov-2024
Total Views |
Sanjay Kelkar

ठाणे : “महाराष्ट्राला पुढे आणण्यासाठी भाजपने जीवाचे रान केले आहे. राज्यात आम्ही चांगले पेरले तेच उगवले असल्याने राज्यात जनतेने बंपर विजय महायुतीला दिला. प्रत्येक पक्षाला वाटते आपल्या जागा वाढल्या पाहिजेत, आपला महापौर झाला पाहिजे. या अनुषंगाने ठाणे महापालिकेत भाजपच्या जागा वाढवण्याकरिता कार्यकर्त्यांची ताकद लावणार आहोत,” अशी भूमिका आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी व्यक्त केली.

मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी वसंतविहार येथील जानकादेवी मंदिरात जाऊन आमदार केळकर यांनी दर्शन घेतले. यावेळी, प्रसारमाध्यमांशी आमदार केळकर बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या १८ पैकी नऊ जागा जिंकून भाजप जिल्ह्यात मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली असून मतांची टक्केवारीही वधारली आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून आ. संजय केळकर यांनी हॅट्ट्रिक केली आहे.

जिल्हात भाजप मोठा भाऊ ठरल्याने ठाणे मनपा निवडणुकीविषयी छेडले असता आमदार केळकर यांनी, निवडणुकीत जागा वाढल्या पाहिजे, पक्ष संघटना वाढली पाहिजे, तसेच आपला महापौर झाला पाहिजे, असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असते.
भाजपमध्ये सामूहिक विचारातून निर्णय घेतला जातो. आम्ही सामूहिक काम करीत असतो. त्यामुळे एकत्रित निर्णय घेतला जाईल. तसेच ठाणे महापालिकेत भाजपच्या जागा वाढण्याकरिता कार्यकर्त्यांची ताकद लावणार असल्याचे आमदार केळकर यांनी स्पष्ट केले.

स्वच्छ प्रतिमेच्या संजय केळकरांना मंत्रिपद द्या!

भाजपच्या राजेश गाडे यांची मागणी

“ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून येत, विजयी हॅट्ट्रिक साधणारे भाजपचे आमदार संजय केळकर हे, स्वच्छ प्रतिमा असणारे आणि तळागाळातील कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारे लोकप्रतिनिधी, अशी त्यांची ओळख आहे. अशा बहुजनहित जपणार्‍या संजय केळकर यांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान देत, त्यांच्या ज्येष्ठत्त्वाचा सन्मान राखण्यात यावा,” अशी आग्रही मागणी भाजपचे ठाणे शहर/जिल्हा उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी माध्यमांशी बोलतांना केली आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदारकी भूषविल्यानंतर, संजय केळकर यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात हॅट्ट्रिक साधून आपले निर्विवाद नेतृत्त्व सिद्ध करून दाखविले आहे. संजय केळकर हे उच्चशिक्षित, संयमी आणि अठरापगड जाती-समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे सुसंस्कृत नेतृत्त्व आहे. त्यांचे आजोबा बॅरिस्टर बर्वे हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक आणि सहकारी होते. त्यामुळे ठाणे शहरातील आंबेडकरी जनतेची अशी मागणी आहे की, ठाणे विधानसभा मतदारसंघाचे ‘हॅट्ट्रिक’वीर अशी ओळख निर्माण झालेल्या संजय केळकर यांना मानाचे मंत्रिपद भूषविण्याची संधी देण्यात यावी, असे राजेश गाडे यांनी सांगितले.

आमदार केळकर यांना मंत्रिपद मिळाल्यास, ठाणे शहराचा विकास, मूलभूत सुखसोयी व नागरी समस्या चुटकीसरशी सुटतीलच, त्याचबरोबर भविष्यातील खरीखुरी ‘स्मार्टसिटी’ म्हणून नावारुपाला येण्यासाठी, आमदार संजय केळकर यांना ठाण्यातून मंत्रिपद मिळालेच पाहिजे, या आग्रही मागणीसाठी ‘स्वाक्षरी-मोहीम’ राबविणार असल्याचे गाडे यांनी सांगितले.