मुंबई : मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना यंदाचा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २५ नोंव्हेबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात मराठी नाट्य कलाकार संघातर्फे साजरा करण्यात आलेल्या 'जागतिक रंगकर्मी दिवस' सोहळ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोहन जोशी यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यात सन्मानमूर्ती मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत रंगकर्मी विघ्नेश जोशी यांनी घेतली. ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रमही यावेळी सादर झाला. या सोहळ्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, प्रमुख कार्यवाह अजित भुरे; तसेच मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष सुशांत शेलार यांच्यासह प्रमुख कार्यवाह विजय सूर्यवंशी, सहकार्यवाह शिवाजी शिंदे, कलाकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप कबरे आदी मान्यवर उपस्थित होते. नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर हा दिवस गेली १० वर्षे मराठी नाट्य कलाकार संघातर्फे 'जागतिक रंगकर्मी दिवस' म्हणून साजरा केला जातो. यंदा या सोहळ्याचे ११ वे वर्ष होते.