काँग्रेसला मुंबईनंतर कोल्हापूरात मोठा धक्का! शिंदे गटात प्रवेश करत महिला आमदाराची काँग्रेसला सोडचिठ्ठी
31-Oct-2024
Total Views | 117
मुंबई : ( Kolhapur Uttar Vidhansabha )राज्यात सध्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळातील नाराजीनाट्य, बंडखोरी व पक्षांतरणाच्या घटना सातत्याने कानावर पडत आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे त्यांच्या पाठोपाठ कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची उमेदवारी डावलल्याने नाराजी व्यक्त करत आमदार जाधव यांनी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेनेत प्रवेश करताच जयश्री जाधव यांना शिवसेनेचे उपनेते पद देण्यात आले आहे. जयश्री जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूरातील शिवसेनेची ताकद वाढणात आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार म्हणून निवडून आले होते. २०२१ मध्ये चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली व त्या निवडून आल्या होत्या.
दरम्यान कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर उमेदवार आहेत. आमदार जाधव यांच्या पक्षांतराचा येत्या निवडणुकीत त्यांना किती फायदा होणार तसेच कोल्हापूर उत्तरच्या निकालावर काय परिणाम होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.