‘सिंघम अगेन’मधील अ‍ॅक्शन सीनमुळे अजय देवगण २-३ महिने…, सलमानने सांगितला ‘तो’ किस्सा

    28-Oct-2024
Total Views |
 
singham again
 
 
मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक नाही तर दोन सुपरहिट चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. सिंघम अगेन आणि भूल भूलैल्या ३ हे दोन्ही बिग बजेट चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहेत. सध्या सिंघम अगेन चित्रपटाचं प्रमोशन अजय देवगण करत असून त्याने सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस १८ च्या वीकेंड का वार या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अजय देवगणबरोबर झालेली एक घटना सलमान खानने सांगितली.
 
सलमान खान म्हणाला की, “अजयने मला एक शॉर्ट दाखवला होता. ज्याच्यात वेळ चुकली. एक व्यक्ती लाकूड घेऊन अजयला मारायला येत होती आणि त्याची वेळ चुकीची होती. त्यामुळे त्या लाकडाचा सरळ फटका अजयच्या डोळ्यावर पडला.” त्यानंतर अजय म्हणाला की, दोन-तीन महिने दिसत नव्हतं. छोटीशी शस्त्रक्रिया झाली असून आता बरीच सुधारणा झाली आहे. पुढे सलमान म्हणाला, “अशा अ‍ॅक्शन सीनमुळे आमच्याबरोबर हे सतत होतं राहत.” तेव्हा अजय म्हणाला, “पण आजकालच्या मुलांसाठी अ‍ॅक्शन करणं सोप झालं आहे. जेव्हा आपण सुरू केलं. तेव्हा चार मजल्यावरून केबल शिवाय उड्या मारायच्या होत्या.”
 
दरम्यान, रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम या चित्रपटाचे यापुर्वी आलेले पाचही भाग यशस्वी झाले होते. आणि आता सिंघम अगेन या सहाव्या भागात लेडी सिंघम अर्थात अभिनेत्री दीपिका पडूकोण हिची एन्ट्री झाली आहे. याशिवाय चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, करिना खान, अक्षय कुमार अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. १ नोव्हेंबरला ‘सिंघम अगेन’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.