मुंबई : खुमासदार लेखनशैली असणाऱ्या आणि आपल्या पुस्तकांच्याच माध्यमातून प्रसिद्धी मिळालेल्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या 'अवघा देहची वृक्ष जाहला..' या पुस्तकाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या संस्थेची स्थापना १८९४ साली झाली आहे. हे पुस्तक वृक्षसंवर्धनाचे चळवळ जगभर रुजवणारे रिचर्ड बेकर यांच्यावर आधारित लिहिलेले आहे. राजहंस प्रकाशनाचे हे पुस्तक फेब्रुवारी महिन्यात २०२२ ला प्रकाशित झाले होते.
रिचर्ड बेकर एकदा म्हणाले होते, "माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केले नाही, तर या ग्रहावर टिकून राहणे आपल्याला शक्य नाही. कोणताही विकास पूर्ण समजूतीनेच व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखले गेले पाहिजे. खनिज, वनस्पती, प्राणी, माणूस.. सर्वांमध्ये!"
वीणा गवाणकर आपल्या पुस्तकाविषयी म्हणतात, "सुमारे ३० वर्षांपूर्वी १९८९ साली नुकतेच डॉ. सलीम अलींचे पुस्तक वाचले होते. त्यावेळी निसर्गावर आधारित पुस्तके शोधताना संत बारब बेकर यांचे 'सहारा चॅलेंज' हे पुस्तक हाती लागले. त्यावेळी वाचतानाच थरार अजूनही लक्षात आहे. यातूनच हे पुस्तक लिहायला घेतले."