मित्रपक्षांची कुस्ती अन् वायनाडची धास्ती!

    26-Sep-2023
Total Views |
Editorial on INDIA allies Congress & CPI spar over Rahul Gandhi's Wayanad seat future

स्वत:चा हक्काचा मतदारसंघ बांधून ठेवणे हे कोणत्याही लोकप्रिय नेत्याचे लक्षण. अनेक नेत्यांनी अनेक दशके एकाच मतदारसंघातून यशस्वीपणे निवडणूक लढविली आहे. गांधी घराण्यातील व्यक्तींना अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांनी नेहमी जिंकून दिले असले, तरी राहुल गांधी यांचे कर्तृत्त्व इतके तोकडे आहे की त्यांना आंदण मिळालेला हा मतदारसंघही राखून ठेवता आला नाही.

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीतील अंतर्गत मतभेद किती खोलवर रुतलेले आहेत, ते कम्युनिस्ट पक्षाच्या एका नेत्याच्या विधानाने पुन्हा एकदा दिसून आले. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू नये, असे मत कम्युनिस्ट पार्टीचे राज्यसभेतील सदस्य संदोषकुमार पी. यांनी व्यक्त केले. ही जागा डाव्या आघाडीत ‘सीपीआय’च्या वाट्याला आली असून, त्यावर आता राहुल गांधी यांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे ‘सीपीआय’ पक्षात नाराजी आहे. संदोषकुमार पी. यांनी ‘सीपीआय’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत हे मत व्यक्त केले. त्यामुळे त्यांच्या या मताकडे अगदीच दुर्लक्ष करता येणार नाही. अर्थात, अजून लोकसभा निवडणुकीला अवकाश असून तोपर्यंत काँग्रेस नेत्यांकडून ‘सीपीआय’चे मन वळविले जाऊ शकते. पण, काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोडण्याबाबत ‘सीपीआय’मध्ये नाराजी आहे, ही गोष्ट आता उघड झाली आहे.

आधीच कम्युनिस्ट पक्ष भारतातून नामशेष होत चालला आहे. केरळ हे या डाव्या पक्षांचे अखेरचे आशास्थान शिल्लक असून ‘सीपीआय’ हा अनेक डाव्या पक्षांमधील एक पक्ष. त्याच्या मोजक्या जागांपैकीही एका जागेवर जर काँग्रेस दावा करणार असेल, तर या पक्षाचे अस्तित्त्वच नामशेष होईल, अशी साधार भीती या पक्षाला वाटणे स्वाभाविकच. त्यामुळेच राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. या मतदारसंघावर मुस्लीम मतदारांचा वरचश्मा आहे. म्हणूनच राहुल गांधी यांना अमेठीतून येथे पळ काढावा लागला होता. मुस्लिमांच्या मतांवर आपलाच हक्क असल्याचा समज तसा सर्वच विरोधी पक्षांचा. त्यातही काँग्रेस, डावे पक्ष, बसपा, राष्ट्रीय जनता दल, डावे, समाजवादी पक्ष वगैरे पक्षांमध्ये मुस्लीम मतांची रस्सीखेच सुरू असते. अनेक प्रादेशिक पक्षांना आपले सवते सुभे सुरक्षित राखायचे आहेत. त्यात काँग्रेसची घुसखोरी त्यांना मान्य नाही. त्यामुळे वरून एकोप्याचा कितीही आव आणला, तरी जागावाटपाच्या खडकावर आपटून विरोधकांच्या एकजुटीची नाव फुटणार आहे, हे उघड दिसते. वायनाडबद्दल ‘सीपीआय’चे हे मतप्रदर्शन त्याचेच निदर्शक आहे.
 
ज्या राज्यातून आपले उमेदवार हमखास निवडून येतील, अशी खात्री आहे, तिथे काँग्रेसला वाटा देण्यास कोणताच पक्ष तयार होणार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांची वायनाडची सुरक्षित जागाही धोक्यात आली आहे. राहुल गांधी यांची अवस्था ‘कोणी मतदारसंघ देता का मतदारसंघ’ अशी होण्याची शक्यता आहे. अमेठीतून पुन्हा उभे राहण्याची हिंमत नाही आणि मुस्लीमबहुल मतदारसंघाखेरीज अन्य कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची क्षमता नसल्याने राहुल गांधी यांची अवस्था अवघड झालेली दिसते. केवळ बापजाद्यांच्या पूर्वपुण्याईवर जगणार्‍यांना यापेक्षा अधिक काही मिळण्याची अपेक्षाही ठेवता येणार नाही. वास्तविक आपला स्वत:चा असा खात्रीचा मतदारसंघ बांधून ठेवणे हे कोणत्याही लोकप्रिय नेत्याचे लक्षण असते. शरद पवार यांनी बारामती, मुलायमसिंह यांनी मैंनपुरी, लालूप्रसाद यादव यांनी छप्रा हे मतदारसंघ आपले बालेकिल्ले बनविले. व्यापक लोकप्रियता लाभलेले आणि जनमनात स्थान असलेले नेते आपल्या राज्यात आणखी एक-दोन मतदारसंघांवरही आपली छाप पाडतात.

लालूप्रसाद यादव यांनी मधेपुरातून एकदा आणि छप्रा या मतदारसंघांतून दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी गुणा, ग्वाल्हेर, विदिशा वगैरे मतदारसंघांतून यशस्वीपणे निवडणूक लढविली आहे. पं. नेहरू यांनी फुलपूर तसेच अलाहाबादमधून निवडणूक लढविली होती. इंदिरा गांधी यांनी तर रायबरेलीपासून बेल्लारीपर्यंत अनेक मतदारसंघांतून यशस्वीपणे निवडणूक लढविली आहे. नरेंद्र मोदी यांची लोकसभेची कारकिर्द अजून केवळ दोनच वेळची असली, तरी त्यांनी गुजरातमधील अहमदाबादबरोबरच वाराणसी या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण केले. पण, ही झाली थोर नेत्यांची गोष्ट. स्वकर्तृत्त्व काहीही नसताना केवळ बापजाद्यांच्या पुण्याईवर जगणार्‍या राहुल गांधी यांची आज झालेली अवस्था अपेक्षितच म्हणायला हवी. राहुल गांधी यांनी तीनदा अमेठीचे प्रतिनिधित्त्व केले. गांधी घराण्याशी या मतदारसंघाचे नाव जोडले गेले होते. ‘पंतप्रधानांचा मतदारसंघ’ अशी ओळख असली, तरी अमेठी हे शहरही अतिशय मागासलेलेच होते.

या मतदारसंघात साधे चित्रपटगृहही नव्हते. यावरून त्याच्या मागासलेपणाची कल्पना यावी. म्हणजे केवळ लोकसभेत जाण्यासाठी राहुल गांधी यांनी येथील मतदारांचा वापर केला. पण त्यांना विकासापासून वंचित ठेवले. स्मृती इराणी यांनी केवळ पाच वर्षांत या मतदारसंघाचा कायापालट केला. इतकेच नव्हे, तर तेथील जनतेशी वैयक्तिक स्तरावर नातेही जोडले आहे. स्वाभाविकच त्यांना यावेळीही विजयाची खात्री आहे.राहुल गांधी यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे त्यांना आज केवळ मुस्लीमबहुल मतदारसंघातूनच निवडणूक लढविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आता उत्तर भारतातील हिंदुत्त्ववादी वातावरणामुळे कोणत्याही सामान्य मतदारसंघातून राहुल गांधी यांना निवडणूक लढविणे शक्य होणार नाही. अमेठीत पराभव झालाच होता. पण, वायनाडमध्ये जिंकल्याने राहुल गांधी खासदार बनू शकले. आता ‘सीपीआय’ने त्यावर दावेदारी केली, तर तो मतदारसंघही हातातून जाण्याची शक्यता आहे. आज अनेक मुस्लीमबहुल मतदारसंघही अनेक पक्षांनी वाटून घेतले आहेत. आम आदमी पार्टी, ‘एमआयएम’सारखे नवे पक्ष त्यात घुसखोरी करू पाहात आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना अखेरीस राज्यसभेवरच जावे लागेल, असे दिसते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.