मुंबई: मराठी ऐतिहासिक चित्रपटांसाठी आजच्या काळात नावाजलेले एकमेव नाव म्हणजे लेखक, दिग्दर्शक 'दिग्पाल लांजेकर'. मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, दिग्पाल यांच्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.यानंतर आता लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा आगामी ऐतिहासिक चित्रपट 'शिवरायांचा छावा' हा 'छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमांची शौर्यगाथा सांगणाऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. दिग्पाल लांजेकर यांनी इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
काय आहे दिग्पाल यांची पोस्ट?
उजळला तेजाने, पुरंदराचा माथा सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा शत्रू होई परास्त, असा ज्याचा गनिमी कावा शिवशंभूचा अवतार जणू अवतरला 'शिवरायांचा छावा'... छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा!’सादरकर्ते, श्री शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर आणि मल्हार पिक्चर कंपनी. ‘शिवरायांचा छावा,’१६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!, अशी पोस्ट दिग्पाल यांनी केली आहे. हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.