पुणे : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह सुरु झाला असून सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी बाप्पाचा आगमन सोहळा सुरु झाला आहे. गणेशचतुर्थीनिमित्त सर्वत्र मंगलमय आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. अशा वातावरणात पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी १०.२३ वा. प्राणप्रतिष्ठेला सुरूवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. याआधी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक मुख्य मंदिरापासून हनुमान रथातून काढण्यात येईल.
दरम्यान यावर्षी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ‘अयोध्येच्या राम मंदिर’चा देखावा करण्यात आला आहे. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १३१ वा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. एकीकडे २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे या भव्य मंदिराच्या प्रतिकृतीत पुण्यात ६४ कलांच दैवत असणारे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यावर रंगकाम केले आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात आले आहेत. प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी उभारण्यात आले आहेत. मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर आहे. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस आहेत.