मुंबई : नोकरी करीत असताना विविध सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार २०२२-२३ करीता अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराचे नाव आता विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार करण्यात आले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधी भरणाऱ्या दुकाने, कंपन्या, कारखाने, वर्कशॉप्स, हॉटेल्स, उपहारगृहे, बँका आदींमध्ये कार्यरत कामगार व कर्मचारी यांना सदर पुरस्कारांसाठी अर्ज करता येणार आहे.
मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर तसेच मंडळाच्या राज्यातील सर्व कामगार कल्याण केंद्रांमध्ये या पुरस्काराचे अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.१८ ऑक्टोबर २०२३ आहे. सदर पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन कामगार मंत्री डॉ.सुरेश (भाऊ) दगडू खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी केले आहे, अशी माहिती मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी दिली आहे.
कामगाराची विविध आस्थापनांमध्ये मिळून एकूण सेवा किमान ५ वर्ष झालेली असावी. तसेच सेवेत असताना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या ५१ कामगारांना सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रु.२५ हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
तसेच मंडळाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त होऊन किमान १० वर्षे सेवा झाली असले अशा कामगारांकडून कामगार भूषण पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यभरातून एका कामगाराची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून रु.५० हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
मंडळातर्फे लीन नंबर (लेबर आयडेंटिटी नंबर) देण्यात आलेल्या कामगारांना www.public.mlwb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरल्याची पावती अर्जदारास मंडळाच्या संबंधित कामगार कल्याण केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन सादर करावयाची आहे. त्याआधारे अर्जदारास केंद्रातून ऑफलाईन अर्ज दिला जाईल.
सदर अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयास दि.१८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोष्टाद्वारे अथवा हस्तपोच सादर करावयाचा आहे. तसेच आर्थिक अडचणीमुळे मागील ३ वर्षात बंद पडलेल्या आस्थापनांतील कामगारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. आस्थापना / कंपनी बंद होऊन डिसेंबर २०२२ मध्ये ३ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधी झालेला असावा.