मुंबई: राज्यातील युवक -युवतींमध्ये कौशल्य विकासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत राज्यातील ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे (आयटीआय) 'पीएम स्कील रन' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच नागपूर विभागात रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी ‘इंडस्ट्री मीट’ व ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पीएम स्कील रन हा आयटीआय मधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सह्हागी व्हावे असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येईल. या कार्यक्रमात पाच लाख युवक युवती सहभागी होणार असून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जवळच्या आयटीआयमध्ये संपर्क साधता येईल. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत नागपूर येथे दुपारी २ वाजता इंडस्ट्री मिट सुद्धा हाती घेतले जाणार आहेत.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. कौशल्य विकास विभाग कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व शासकीय व खासगी आयटीआयचे बळकटीकरण करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहे. आज आयटीआय मध्ये कौशल्य प्रधान शिक्षण देण्यासाठी ९०० पेक्षा जास्त अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, आंतराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्र उपलब्ध आहे, अगदी संगीत वाद्य शिक्षणापासून ते ड्रोन टेक्नॉलॉजी पर्यंत सर्व विषयांचे शिक्षण देण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञ शिक्षक आहेत. राज्यातील आयटीआयचे बळकटीकरण, रोजगाराच्या नवीन संधींची उपलब्धता आणि कशाला विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आपल्या युवक युवतींना सक्षम करून हा विश्वास आहे" असे कॅबिनेट मंत्री लोढा यांनी सांगितले.