मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २०१६ नंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. त्याबद्दल ट्विटरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात की, श्री गणरायाच्या आगमनाच्या पुढ्यात हा संकल्प मराठवाड्यात विकासाची गंगा आणेल. यासाठी ४६ हजार ५७९ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे. तसेच आजच्या लोकाभिमुख निर्णयाने मराठवाड्याचा अनुशेष दूर होईल व महायुतीचे आपले सरकार जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करेल, ही खात्री मला आहे, असा ही फडणवीस म्हणाले.
दरम्यान २०१६ मध्ये आपण मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पोस्टच्या माध्यामातून सांगितले. परळी वैजनाथ येथे आयुर्वेद पार्क, वेरूळ येथे शहाजी राजे भोसले यांचे स्मारक, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा नवी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाड्यातला दुष्काळ हटविण्याचे भगीरथ प्रयत्न, वेरूळच्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिराचा १५६.६३ कोटींचा, श्री तुळजा भवानी मंदिराचा १,३२८ कोटींचा, तर ६१ कोटींचा श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह पर्यटन विकासासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत.