मुंबई : महाराष्ट्रात अनेक परिवर्तनात्मक पायाभूत उपक्रमांची आखणी केल्याबद्दल आणि राज्यातील कारभारात आमूलाग्र बदल केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या स्वराज्य या अग्रगण्य मॅगझीनच्या वतीने फडणवीसांचा सन्मान करण्यात आला आहे.
शुक्रवारी पाँडेचेरीत झालेल्या पाँडी लिट फेस्टिव्हलमध्ये देवेंद्र फडणवीस उपस्थित राहू शकणात नव्हते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी स्वराज्य मॅगझीनच्या मान्यवरांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील शासकीय निवासस्थानी या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख असे पुरस्काराचे स्वरुप असून या पुरस्काराची रक्कम दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा फडणवीसांनी यावेळी केली आहे.