मुंबई : जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद भरती संदर्भातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीला गती आली असून भरतीची सर्व प्रकीया आयबीपीएस कंपनीकडून राबवली जात आहे. अर्ज स्विकारल्यानंतर परीक्षार्थींचे परीक्षेकडे लक्ष लागले होते. तसेच, जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कंपनीने दिलेल्या वेळापत्रकात ३ ऑक्टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे. तर ४ ऑक्टोबरला आरोग्य पर्यवेक्षक रिंगमन व फिटर या पदांची परीक्षा होणार आहे. यानंतर ५ ऑक्टोबरला मेकॅनिक पदाची परीक्षा होणार आहे. या पदांव्यतिरिक्त उर्वरीत पदांच्या परीक्षा कधी होणार, हे मात्र जाहीर केलेले नाही. राज्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण ३० संवर्गासाठी तर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या १९ संवर्गाच्या रिक्त जागांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. सध्या शाळा,कॉलेजमध्ये सेमिस्टर सुरु असल्याने, परीक्षेचे नियोजन टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.