कल्याण : मानसिक तणाव दूर करण्यासाठी व सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी मन स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.याकरिता विपश्यना साधन महत्वपूर्ण असून दररोज आनापान ध्यान साधना करून मनशक्ती वाढवा, असा सल्ला कडोंमपाचे शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी दिला.
मुलांना शिकवण्याबरोबर शासनाने नेमून दिलेल्या विविध कामांमुळे शिक्षकांवरील मानसिक तणाव वाढत चाललेला आहे. हा तणाव दूर करण्यासाठी मुंबई परिसर विपश्यना केंद्र व सम्राट अशोक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आनापान ध्यान सराव कार्यशाळेच्या आयोजन केले होते. ही कार्यशाळा पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय प्राथमिक, माध्यमिक ,सेंट वाय. सी. इंग्लिश स्कूल ,सम्राट अशोक इंग्लिश स्कूल, व विपश्यना बालविहार च्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता आयोजित केली होती. यावेळी क.डो.म.पा.चे शिक्षण अधिकारी विजय सरकटे उपस्थित होते.
सरकटे म्हणाले, मानसिक तणाव दूर करण्यासाठी व सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी मन स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.याकरिता विपश्यना साधन महत्वपूर्ण असून दररोज आनापान ध्यान साधना करून मनशक्ती वाढवा. तसेच विद्यार्थ्यांनाही शाळा भरल्यावर व सुटतेवेळी दहा मिनिटे आनापान ध्यान साधना करून घ्या.जेणेकरून विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल ते सकारात्मक होतील असे सांगितले.
मुंबई परिसर विपश्यना केंद्राचे अध्यक्ष कीर्ती देढीया म्हणाल्या, विपश्यना कोणत्या जाती धर्माकरिता नाही. विपश्यना एक विज्ञान आहे.विपश्यना म्हणजे एक चांगला माणूस तयार करण्याचे साधन आहे. कार्यशाळेत शिक्षक, मुख्याध्यापकांबरोबर आयोजक संकेत देढीया, नितीन सराफ व सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले उपस्थित होते.