‘द काश्मिर फाईल्स’सारखे चित्रपट प्रसिद्ध होत आहेत हे घातक – नसरुद्दीन शाह

    11-Sep-2023
Total Views |
 
nasaruddin shah
 
 
मुंबई : “देशात ‘द काश्मिर फाईल्स’ सारखे चित्रपट प्रसिद्ध होत आहेत, हे त्रासदायक आहे”, असे स्पष्ट मत अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी नुकतेच एखा मुलाखतीत मांडले. 'मॅन वुमन मॅन वुमन' या लघुपटाचे दिग्दर्शन नसरुद्दीन शाह यांनी केले असून तब्बल १७ वर्षांनी शाह दिग्दर्शन क्षेत्रात परतले आहेत. दरम्यान या मुलाखतीत त्यांनी ‘गदर २’ आणि ‘द केरला स्टोरी’ हे चित्रपट कसे चालू शकले? असा प्रश्न देखील उपस्थित केला.
 
यापुर्वी नसरुद्दीन यांनी ‘यु होता तो क्या होता’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यात अभिनेता इरफान खान, जिमी शेरगिल आणि रजत कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाच्या अनुशंगानेच १७ वर्ष पुन्हा दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी का लागली? असा प्रश्न विचारला असता नसरुद्दीन म्हणाले की, “एवढे वाईट चित्रपट बनवण्याच्या धक्क्यातून मी सावरत होतो. मला अपेक्षा होती तसे ते बनले नाहीत. कथा अथवा चित्रपट लिहिण्याच्या बाबतीत मी त्यावेळी योग्य मनस्थितीत नव्हतो. मी फक्त विचार केला की जर मी सर्व उत्कृष्ट कलाकार एकत्र केले तर ते चांगले काम करतील. मला आधी वाटले की ही एक चांगली संहिता आहे. पण नंतर माझ्या लक्षात आले की या संहितेत काही त्रुटी आहेत, विशेषतः इरफान खानच्या कथेत. कलाकारांचे योगदान बाजूला ठेवून ही माझ्यासाठी मोठी निराशा होती. या सगळ्याची जबाबदारी मी घेतो. मी दुसरा चित्रपट करेन असे कधीच वाटले नव्हते कारण ते खूप मेहनतीचे आहे”.
 
दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची प्रेरणा बदलली आहे का? असे विचारले असता नसरुद्दीन यांनी होकारार्थी उत्तर दिले. “सद्यस्थितीला तुम्ही जितके चंगळवादी असाल तितके तुम्हाला प्रसिद्ध मिळेल. कारण तेच चंगळवादी या देशावर राज्य करत आहेत. आपल्या देशावर प्रेम करणे पुरेसे नाही तर त्याबद्दल वारंवार बोलणे आणि काल्पनिक शत्रू निर्माण करणे देखील आवश्यक आहे. मात्र, असे चित्रपट तयार करत आपण जे चित्रपट तयार करत आहोत ते फारच घातक आहेत हे या लोकांना कळत नाही”, असा टोला देखील यावेळी नसरुद्दीन यांनी दिग्दर्शकांना लगावला. 'द केरला स्टोरी’ आणि ‘गदर २’ हे चित्रपट मी पाहिले नाही, पण त्यांचे कथानक काय आहे याची कल्पना असून ‘द काश्मीर फाईल्स’ सारख्या चित्रपटांना इतका प्रतिसाद मिळत असेल, तर ते त्रासदायक असून भावी पिढी धोक्यात आहे”, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. “सध्या वास्तविक विषयांवर आधारित चित्रपटांवर भर असून सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा यांनी तयार केलेले चित्रपट शिलाय हंसल मेहता जे घडून गेलेले सत्य दाखवू पाहात आहेत ते लोकांना दिसत नाही. अशावेळी चित्रपट निर्मात्यांनी हिंमत न हारता चित्रपटाच्या माध्यमातून कथा सांगत राहणे महत्त्वाचे आहे”, असेही नसरुद्दीन म्हणाले.
 
चित्रपट हे मनोरंजनाचे सर्वात महत्वाचे माध्यम आहे. या माध्यमातून पुढच्या पिढीला मागच्या पिढीतील चित्रपटातून महत्वाच्या बाबी कळतील. परंतु, ‘गदर २’ सारखे चित्रपट जर का भावी पिढी पाहात असेल तर नेमके सत्य काय होते? दुसऱ्या समाजाला कमी लेखणारे चित्रपट तयार करण्यात निर्माते, दिग्दर्शक गुंतले होते असा समज त्या पिढीचा होईल, अशी भीती देखील यावेळी नसरुद्दीन यांनी व्यक्त केली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.